सांगली जिल्ह्यातील 46 मार्ग वाहतुकीसाठी खुले; पावसाची उसंत; पूरस्थिती टळली

विष्णू मोहिते
Saturday, 17 October 2020

सांगली जिल्ह्यात सलग तीन दिवस दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाने आज उसंत घेतली. कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला, त्यामुळे पूरस्थिती टळली.

सांगली : जिल्ह्यात सलग तीन दिवस दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाने आज उसंत घेतली. कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला, त्यामुळे पूरस्थिती टळली. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदीची पातळी रात्री उशिराने 29 फुटांपर्यंत घटली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 रस्त्यांवर पाणी आले होते, त्यापैकी सायंकाळपर्यंत 46 मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले; मात्र अद्यापही 44 मार्ग बंद राहिले. 

धो-धो बरसणाऱ्या पावसाने उघडीप दिली आहे. ओढे-नाल्यांचे पाणी संथ गतीने उतरत आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. गुरुवारी रात्री 36.8 फुटांवर गेलेली पातळी शुक्रवारी रात्री 29 फुटांपर्यंत घटली होती. द्राक्ष, डाळिंब, ऊस, भाजीपाल्यासह सर्व पिकांच्या नुकसानीची पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पाहणी केली. शेतकरी मात्र होणाऱ्या नुकसानीतून सावरण्यासाठीची धडपड करीत होते.

द्राक्ष, डाळिंब वाचवण्यासाठी, तर अन्य पिकांच्या काढणीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. जिल्ह्यात पावसामुळे 90 मार्ग बंद झाले होते. त्यातील 46 मार्ग पुन्हा सुरू झाले असून अद्याप 44 मार्ग बंदच आहेत. 

जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. याचा जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक क्षेत्राला फटका बसला असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामे अपेक्षित आहेत. दोन दिवसांच्या उघडीपीनंतर आज मोठा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यातील 36 मंडलातील सर्व गावांत अतिवृष्टी झालेली आहे. कृषी विभागाच्या सुधारित माहितीनुसार 620 गावांतील वीस हजार शेतकऱ्यांच्या सव्वाआठ हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान झालेले आहे. 

48 तासांनी वीजपुरवठा 
जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतीसह गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरूच आहेत; मात्र नुकसान जादा अन्‌ कर्मचारी कमी असल्यामुळे कामांना विलंब होत आहे. कवलापुरातील एका भागात तब्बल 48 तासांनी आज दुपारी एक वाजता विद्युतपुरवठा कायम करण्यात यश आले आहे. 

जिल्ह्यात 8.54 मिलिमीटर पाऊस 
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 8.54 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 15.5 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज- 8.4 (764.6), तासगाव- 11.8 (694.2), कवठेमहांकाळ- 2.8 (761.6), वाळवा-इस्लामपूर- 14.2 (873.5), शिराळा- 15.5 (1454.2), कडेगाव- 2.1 (748.8), पलूस- 8.5 (732.5), खानापूर- विटा 6.4 (994.2), आटपाडी- 6.0 (957.9), जत- 3.1 (534.2).

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 46 roads open for traffic in Sangli district; Rainy season; Precedent avoided