esakal | गावी निघाले अन इथेच अडकले...
sakal

बोलून बातमी शोधा

467 workers stoped in Miraj

सांगली-मिरज-कुपवाडसह आसपासच्या खेड्यांमध्ये माहितीपर पुस्तके आणि अन्य साहित्याची विक्री करणाऱ्या 467 परप्रांतीय विक्री कर्मचाऱ्यांना पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गावाकडे जाताना रोखले.

गावी निघाले अन इथेच अडकले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज : सांगली-मिरज-कुपवाडसह आसपासच्या खेड्यांमध्ये माहितीपर पुस्तके आणि अन्य साहित्याची विक्री करणाऱ्या 467 परप्रांतीय विक्री कर्मचाऱ्यांना पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गावाकडे जाताना रोखले. त्यांची ते यापूर्वी राहत असलेल्या ठिकाणीच राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन त्यांना थांबवण्यात आले. या घटनेमुळे आज (सोमवारी) सकाळी मिरज कुपवाड रस्त्यावर बराच गोंधळ निर्माण झाला 

मिरज कुपवाड परिसरात काही खाजगी संस्थानी नियुक्त केलेले शेकडो परप्रांतीय कर्मचारी राहतात. यापैकी बहुसंख्य कर्मचारी हे माहितीपर शैक्षणिक पुस्तके, स्टेशनरी, वगैरे साहित्याची घरोघरी जाऊन विक्री करतात. यामध्ये 15 तरुणींसह मोठ्या संख्येने तरुणांचा समावेश आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचाही घरोघरी जाऊन पुस्तके आणि स्टेशनरीची विक्री करण्याचा व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना नियुक्त केलेल्या संस्थांनी त्यांचा पगार थांबवला.

हाजिकच या तरुण कर्मचाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून उपासमार सुरू झाली. ते राहत असलेल्या ठिकाणीही संबंधित जागा मालकांनी त्यांना खोल्या खाली करण्यास सांगितले. अशा विचित्र परिस्थितीत सापडलेल्या या सर्व तरुण-तरुणी कर्मचाऱ्यांनी चालतच आपापले गाव काढण्याचा निर्णय घेतला. ही सर्व तरुण कर्मचारी केरळ, तामिळनाडू, राज्यातील आहेत. त्यांनी रविवारी (ता.29) रोजी सायंकाळी आपले गाव गाठण्यासाठी कुपवाड मधून चालत जाण्यास सुरुवात केली. गटागटाने निघालेल्या या तरूणांना उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी हटकले. आणि त्यांना एका मोकळ्या मैदानात एकत्र जमवुन बसवले.

तेथे त्यांची व्यथा जाणून घेऊन या सर्वांना त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करत असल्याचे सांगून धीर दिला. यावेळी तहसीलदार रणजित देसाई, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, कामगार आयुक्त श्री गुरव यांनीही ही याठिकाणी येऊन या कामगारांची माहिती घेतली आणि आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारून या कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सर्व कामगारांना ते यापूर्वी राहत असलेल्या खोल्यांमध्ये सोडण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत या खोल्यांमधून बाहेर पडण्याचे नाही या अटीवर त्यांना या ठिकाणी सोडण्यात आले आहे. 

चहा बिस्कीटे आणि ...

अनेक किलोमीटरची पायपीट करून भुक तहानेने व्याकूळ झालेले हे तरुण कोणाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्हाला गावाकडे जाऊ द्या या मुद्द्यावर ते ठाम होते.याचवेळी त्यांना मिरज येथील विटा डेअरी फार्मचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी चहा बिस्किटे दिली.कुलकर्णी यांची ही छोटीशी मदत आणि पोलिस उपअधीक्षक गेली यांचे समुपदेशन यामुळे या तरुणांमध्ये स्थानिक नागरिक आणि प्रशासनाबाबत विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय स्थगित केला.