विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या नजरा शिक्षण खात्याच्या निर्णयाकडे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

कोरोनामुळे शिक्षणाची घडी विस्कटली असून मुलांवरील शैक्षणिक भार कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

बेळगाव : शैक्षणिक वर्ष सुरु होऊन सहा महिने पूर्ण होण्यास आले, तरी अद्याप शाळांना सुरुवात झालेली नाही. कोरोनामुळे शिक्षणाची घडी विस्कटली असून मुलांवरील शैक्षणिक भार कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याकरीता शिक्षण खात्याकडून पालक, शिक्षणतज्ज्ञ व अभ्यासकांना आवाहन करुन त्यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. त्यानुसार यंदा ५० टक्के अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी केली आहे. यामुळे शिक्षण खात्याच्या निर्णयाकडे आता विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

हेही वाचा - गल्लीत कुत्र मेलं, मृत्यूची शंका आली म्हणून थेट केंद्र सरकारला मेल अन् चौकशीसाठी तीन उपायुक्तांची नेमणूक 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाकडून तीस टक्के शैक्षणिक अभ्यासक्रम कपात करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्यानुसार सुधारीत अभ्यासक्रम घोषित करण्याची तयारीही सुरु झाली आहे. परंतु, अद्यापही शाळा सुरु होण्यासाठी विलंब होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता ५० टक्के अभ्यासक्रम कपात करण्याबाबत अभिप्राय मागविला जात आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असली, तरी नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरु केल्या जाऊ शकतात, असे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नोव्हेंबर ते मार्चअखेरर्पंत शाळा सुरु झाल्या, तरी ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्‍य नाही. त्यामुळे ३० वरुन ५० टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा प्रस्ताव आहे. जितका अभ्यासक्रम कपात केला जाईल, तो पुढील वर्षी शिकविण्याचा किंवा ब्रिज कोर्सच्या माध्यमातून भरून काढण्याचा शिक्षण खात्याचा विचार आहे. मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

हेही वाचा -  NH 4 झाला आता श्रीलंका रोड : नवा नंबर- AH 47 

सुटीच्या दिवशीही शाळा?

सुटक्षच्या दिवशी शाळा सुरु ठेवण्याचा अभिप्राय शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे. त्यानुसार शाळेला नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाल्यानंतर २३ नोव्हेंबर, २६ डिसेंबर, २५ जानेवारी, २४ फेब्रुवारी, २६ मार्च, १० एप्रिल यादिवशी शाळा सुरू ठेवण्याची शक्‍यता आहे. परंतु, हे विद्यार्थ्यांवर अतिताण ठरू शकते, असे मत शिक्षकांचे आहे. यामुळे शिक्षण आणि अभ्यासक्रमासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणखी एक बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 percent syllabus dropped from exams for school demanded education experts