esakal | अतिवृष्टी, पूरामुळे शेतीपिक नुकसानीसाठी ५३ कोटी निधी उपलब्ध | Sangli
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टी, पूरामुळे शेतीपिक नुकसानीसाठी ५३ कोटी निधी उपलब्ध

अतिवृष्टी, पूरामुळे शेतीपिक नुकसानीसाठी ५३ कोटी निधी उपलब्ध

sakal_logo
By
विष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा

सांगली : माहे जुलै महिन्यातील अतिवृष्टी व पूरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याकरीता सांगली जिल्ह्यासाठी ५२ कोटी ७५ लाख अनुदान उपलब्ध झाले आहे. मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांना शेतकऱ्यच्या थेट बॅंक खात्यावर उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

दोन महिने झाल्यानंतरही मदत मिळाली नसल्याने शेतकरी यांच्यात प्रचंड नाराजी पसरत आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेतल्याने प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्याला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. १ लाख ५६५ शेतकऱ्यांचे ३९ हजार ६९५ हेक्टर जमिनीचे पंचनामे झाले. शेतीचे ५४ कोटींचे नुकसान झाले होते.

सव्वा दोन महिन्यानंतर सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५५० कोटी वर्ग केले. पुणे विभागासाठी १५० कोटींची मदत होती. सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रक्कम वर्ग केली. मदत मिळण्याबाबत विलंब होत होता. अतिवृष्टी आणि कोयना, चांदोली धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी आणि भुईमूग पिकांना फटका बसला होता. उभी पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर संपूर्ण ऊस पाण्यात बुडाल्याने तो वाया गेला. पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली होती.

तालुकानिहाय अनुदान असे

शेतीपिके, बहुवार्षिक पिके नुकसानीसाठी तालुकानिहाय उपलब्ध करून देण्यात आलेले अनुदान असे- मिरज - १६ कोटी ७७ लाख ६८ हजार रूपये, तासगाव - ३ लाख १५ हजार रूपये, वाळवा - १८ कोटी ९२ लाख ७ हजार रूपये, शिराळा - ६ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपये, पलूस - १० कोटी ५४ लाख ४५ हजार रूपये. असे एकूण ५२ कोटी ७५ लाख रूपये इतके अनुदान बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा निधी संबंधित तह‍सीलदार खर्च करतील.

loading image
go to top