बनाळी येथे रेशनिंगचा 60 पोती तांदुळ पकडला; तिघांना अटक

बादल सर्जे
Sunday, 22 November 2020

बनाळी जिल्हा परिषद शाळेजवळ पोलिस पेट्रोलिंग करताना रेशनिंग दुकानातील 60 पोती तांदुळ काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जात असताना पकडला.

जत : बनाळी (ता. जत, जि. सांगली ) जिल्हा परिषद शाळेजवळ पोलिस पेट्रोलिंग करताना रेशनिंग दुकानातील 60 पोती तांदुळ काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जात असताना पकडला. महिन्याभरात दुसरी घटना उघडकीस आली आहे.

शनिवारी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तिघा संशयित आरोपींसह चारचाकी गाडी, दुचाकी व साठ पोती तांदुळ, असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत जत पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. 

पोलिसांनी प्रमोद उत्तम संकपाळ (वय 28), बसवराज विरपक्ष शेट्टी (वय 35, दोघे रा. डफळापूर, ता. जत) व किशोर भानुदास देवकुळे (वय 27, रा. जत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. वरील तिघांनी संगनमत बनाळी परिसरातील रेशनिंगचा साठ पोती तांदुळ गोळा केला होता.

एका चारचाकी गाडीत भरून जात असताना जत पोलिसांना रात्री पेट्रोलिंग करताना आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता तिघांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसांना शंका उपस्थित झाल्याने त्यांची झाडाझडती केली तर रेशनिंग दुकानातील साठ पोती तांदुळ गाडीत आढळून आला.

पोलिसांनी तात्काळ तिघा आरोपींना ताब्यात घेत जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब कत्ती करत आहेत. यापूर्वी बिळूर येथे दि. 4 नोव्हेंबर रोजी 1300 किलो गहू व 450 किलो तांदूळ, असा 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 bags of ration seized at Banali; Three arrested