Belgaum : ऊसतोडणीसाठी प्रतिटन ६०० रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

ऊसतोडणीसाठी प्रतिटन ६०० रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खानापूर : कारखान्यांची नियोजनशून्यता आणि ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्यांच्या कमतरतेमुळे यंदा तोडणीचे भाव वाढले आहेत. तोडणीसाठी प्रतिटन ६०० रुपये मोजावे लागतात. वाहतूक करणारे चालकही ५०० रुपये प्रतिट्रक घेत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. प्रशासनाने यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खानापूर तालुक्यात उसाचे मोठे क्षेत्र आहे. बेळगावसह सीमाभाग व महाराष्ट्रातील दहा ते पंधरा साखर कारखान्यांना येथून ऊस पाठविला जातो. दरवर्षी महाराष्ट्रातून ऊसतोडणी कामगार मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, यंदा कारखान्यांकडून आगाऊ रक्कम घेऊनही कामगार आलेले नाहीत. त्यामुळे, आलेल्या कामगारांनी तोडणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट केले आहेत.

ते सध्या शेतकऱ्यांकडून प्रतिटन ३०० ते ३५० दर घेत असून त्यांना कारखान्याकडून प्रतिटन २८० ते ३०० रुपये तोडणी मिळत आहे. दोन्ही मिळून प्रत्येक टनाला ६०० ते ६५० रुपये मोजावे लागत आहेत. यात गाडी वाहनचालकाकडूनही प्रत्येक खेपेला ५०० रुपये घेतले जात असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. तोडणीच्या या वाढलेल्या दरावर कारखाना प्रशासन कोणतीच भूमिका घेत नसून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

उसाच्या उचलीस विलंब

येथील स्थानिक कारखाना असलेल्या लैला शुगर्सचे प्रशासन उसाच्या उचलीस विलंब करीत आहे. गाळपाला सुरुवात होऊन महिना उलटला, तरी कारखान्याकडे पुरेशा ऊसतोडणी टोळ्या उपलब्ध नाहीत. परिणामी, बराचसा ऊस बाहेरच्या कारखान्यांना जात आहे. कारखान्याने यंदा गाळप क्षमता वाढवूनही उसाच्या उचलीकडे दुर्लक्ष केल्याने उद्दिष्ट गाठणे कठीण आहे.

loading image
go to top