आटपाडीत तालुक्‍यात अतिवृष्टीने 67 पुलांची वाताहत 

नागेश गायकवाड
Monday, 19 October 2020

अतिवृष्टीच्या दणक्‍याने तालुक्‍यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील तीन, जिल्हा मार्गावरील चार आणि जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांवरील तब्बल दहा पुलांची दुर्दशा झाली आहे. काहींचे भराव वाहून गेलेत, तर काही पूलच वाहून गेले.

आटपाडी : अतिवृष्टीच्या दणक्‍याने तालुक्‍यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील तीन, जिल्हा मार्गावरील चार आणि जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांवरील तब्बल दहा पुलांची दुर्दशा झाली आहे. काहींचे भराव वाहून गेलेत, तर काही पूलच वाहून गेले. एकूणच या पावसात तालुक्‍यातील अनेक पुलांचा खुळखुळा, तर रस्त्यांची चाळण झाली आहे. 

आटपाडी तालुक्‍यात यावर्षी अतिवृष्टीने मोठा धुमाकूळ घातला. या अतिवृष्टीचा दणका तालुक्‍यातील अनेक रस्ते आणि पुलांना बसला आहे. तालुक्‍यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पुजारवाडी, दिघंची आटपाडी रस्त्यावरील जाधव मठ आणि शेटफळे येथील पुलाचे भाराव आणि लगतचे रस्ते वाहून गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली आहे. 

जिल्हा मार्गावरील करगणी- चिंचघाट, दिघंची- निंबवडे, कौठळी आणि नेलकरंजी पूल वाहून गेले असून, रस्त्याचेही तेवढेच नुकसान झाले आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे असलेल्या करगणी- शेटफळे, करगणी माळेवाडी, करगणी- तळेवाडी, शेंडगेवाडी, खरसुंडी- वलवण, शेटफळे- रेबाईमळा, वलवण येथील शिंदेवस्ती, दिघंची येथील ढोलेमळा आणि महाडिकमळा, खानजोडवाडी, कतडवळे येथील मरगळे वस्ती आणि बाळेवाडी येथील कोळेकरवस्ती वरील पूल वाहून गेले असून; अद्याप रस्ते पाण्याखालीच आहेत. 

याशिवाय प्रत्येक गावातून वाडी-वस्तीवर जाण्यासाठी विविध फंडांतून आणि रोजगार हमी योजनेतून डांबरीकरण- मुरमीकरण केलेल्या रस्त्यांवरील पन्नासहून अधिक मोरी, पूल वाहून गेले आहेत. गावातून वाडी-वस्तीवर जाणारे बहुतांश रस्त्याची मोठी वाताहत झाली आहे. 

अतिवृष्टीचा दणका बसलेले पूल 
- राज्य मार्गावरील पूल - 3 
- जिल्हा मार्गावरील पूल - 4 
- जिल्हा परिषद रस्त्यावरील पूल- 10 
- गावातून वाडी-वस्तीवर जाणारे पूल-मोरी - 50

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 67 bridges in Atpadi taluka due to heavy rains