इथे आहेत ८०० वर्षांच्या इतिहासाचे मूक साक्षीदार, पण

शिवाजीराव चौगुले
Friday, 29 May 2020

भाटशिरगांव (ता. शिराळा, जि. सांगली ) येथे प्राचीन महादेव मंदीर व हनुमान मंदिराच्या आवारात आठशे वर्षा पूर्वीच्या दुर्मिळ वीरगळ आहेत. इतिहासकालीन ठेवा म्हणून संवर्धन होणे गरजेचे आहे. 

शिराळा : भाटशिरगांव (ता. शिराळा, जि. सांगली ) येथे प्राचीन महादेव मंदीर व हनुमान मंदिराच्या आवारात आठशे वर्षा पूर्वीच्या दुर्मिळ वीरगळ आहेत. इतिहासकालीन ठेवा म्हणून संवर्धन होणे गरजेचे आहे.

"पुरातत्वशास्त्र व इतिहास संशोधक व इतिहासाचे मुक साक्षीदार- वीरगळ आणि सतीशिळा' पुस्तकाचे लेखक अनिल दुधाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचे वीरगळ शिलाहार (इ. स. 800 ते 1000) अथवा यादवकालीन (इ. स. 860 ते 1317) असावेत. या वीरगळांत पायदळ, घोडदळ आणि हत्तीदळ या तीनही प्रकारांतील युद्धप्रसंग चितारले दिसतात. वीरगळांवर रेखाटलेली पायदळ व घोडदळांची लढाई तत्कालीन योद्‌ध्यांचे विविध क्षेत्रांतील युद्धनैपुण्य दर्शवते. वीरगळांवरील शिवलिंग त्या काळातील शैव-पंथाचा प्रभावही दर्शवते. 

वीरगळ म्हणजे "स्मारकशिळा'. समरप्रसंगात अथवा युद्धात धारातिर्थी पडलेल्या योद्‌ध्याच्या स्मरणार्थ उभारलेली सचित्र, शिल्पांकित शिळा. वीरगळ कर्नाटक व आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वीरगळांचे शिलाहार व यादव काळात मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य झाल्याचे आढळते. महाराष्ट्र विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रावर या तत्कालीन स्मारकशिळा निर्मितीचा प्रभाव आढळतो. रणांगणात धारातीर्थी पडणा-या शूरवीरास स्वर्ग व मोक्षप्राप्ती होते ही धर्मश्रद्ध भावना या वीरगळांच्या उभारणीची प्रेरणा असल्याचे दिसून येते. 

ऐतिहासिक पर्यटनाचे केंद्रही होऊ शकेल

वैविध्यपूर्ण वीरगळीमुळे भाटशिरगांवचा, लढाऊ, मातीसाठी रणांगणात रक्त सांडणा-या पराक्रमी योद्‌ध्यांचा तसेच उच्चपदस्थ सेनानी तसेच वतनदारांचा शेकडो वर्षांचा इतिहास समोर येतो. प्रत्येक गावांत असे वीरगळ असू शकतात. युवकांनी शोध घेऊन गावचा इतिहास जाणून, जपण्याचा प्रयत्न करावा. वीरगळ या प्राथमिक व ऐतिहासिक साधनांचे गावोगावी सुयोग्य संवर्धन व्हायला हवे. वीरगळ सुस्थितीत असणारे गाव ऐतिहासिक पर्यटनाचे केंद्रही होऊ शकेल. अधिक जागरूकता आणि संशोधन गरजेचे आहे.

- कैलास देसाई, इंजिनियर व इतिहास अभ्यासक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 800 years old historic things preserved at Bhatshirgao