बायपास शस्त्रक्रियेवर ८२ व्या वर्षी मात ; दामोदर आजोबांचा सहा किमी चालण्याचा व्यायाम अविरत सुरुच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

सध्या त्यांचा सकाळ सध्यांकाळ सहा किलोमीटर चालण्याचा दिनक्रम सुरू आहे.

मिरज (सांगली) : तब्बल चाळीस वर्षे वीट वाळुच्या धंद्यात राहुनही व्यसन मासांहारापासुन दुर राहुन शिस्तबध्द दिनक्रम असणारे दामोदर विठोबा कुंभार 83 वर्षाचे आहेत. सध्या त्यांचा सकाळ सध्यांकाळ सहा किलोमीटर चालण्याचा दिनक्रम सुरू आहे. पण हे चालणे सुरू राहिलय ते केवळ डॉ. तुषार धोपाडेंमुळे अस अगदी खणखणीत आवाजात दामोदर कुंभार सांगतात.

पहाटे पाच वाजता उठणे,तीन किलोमीटर चालणे, घरातील किरकोळ कामे असा त्यांचा दिनक्रम आहे. केवळ दोन महिन्याचे असताना आईचे छत्र हरवलेले दामोदर कुंभार यांची जिवनशैली तशी खुपच शिस्तबध्द. वीट वाळुचा धंदा करताना त्यांनी जीवनशैली शिस्तबद्ध ठेवली. तरीही कुठेतरी गणित चुकले आणि वयाच्या 72 व्या वर्षी त्यांची पहिली अँजोप्लास्टी झाली. दोन किरकोळ झटकेही येऊन गेले. मिरजेच्या सेवासदनमध्ये पुन्हा तपासणी केली तर हृदयाला जाणाऱ्या दोन्ही मुख्य वाहिन्या तब्बल 99 टक्के आणि दोन उपवाहिन्या 80 आणि 85 टक्के बंद होते.

हेही वाचा - आग लावणे सोपे आणि विझवणे कठीण ; जाधवांनी पेटवल्या सहा हजार चूली

ह्रदयाची झडपही खराब झाली होती. ह्रदयाचे पंपीग केवळ चाळीस टक्‍क्‍यांवर आले. जे साठ टक्के अपेक्षित असते. केवळ शस्त्रक्रियेचा पर्याय होता. पण मिरजेचे प्रसिध्द कार्डिअक सर्जन डॉ. तुषार धोपाडे यांनी 21 नोव्हेबंर 2019 रोजी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत अखंड पणे शस्त्रक्रिया करून हृदयातील मुख्य झडप बदलली, दोन्ही मुख्य वाहिन्या बदलल्या त्यासाठी दोन्ही पायातील मोठ्या शिरा काढुन त्या बसविल्या आणि दोन उपवाहिन्यांमधील 80 आणि 85 टक्‍क्‍यांचे अडथळे दुर केले.

शस्त्रक्रिया होऊन आज सव्वा वर्ष झाले आहे. आज दामोदर कुंभार ठणठणीत आहेत. दररोज सहा किलोमीटर चालण्याचा व्यायाम,दोन वेळा जेवण,नाष्टा असा संतुलीत आहार घेऊन अतिशय आनंदी आहेत. डॉ. तुषार धोपाडे आणि डॉ. रविकांत पाटील यांच्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे दामोदर कुंभार हात जोडुनच सांगतात. मी 83 वर्षांचा असलो तरी 38 वर्षाचे डॉ. धोपाडे हेच माझे दैवत असल्याचेही ते सांगायला विसरत नाहीत.  

हेही वाचा - तुम्ही माझ्या जागेत आला आहात म्हणत तरुणाने डॉक्टरांसह कुटुंबियांना केली मारहाण -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 82 year old damodar kumbhar bypass surgery successful