एसटी सांगली विभागाकडून दिवाळीसाठी 87 जादा फेऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 87 extra rounds for Diwali from ST Sangli Division

एसटीच्या सांगली विभागाने दिवाळीनिमित्त दहा आगारातून 87 जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. 11 ते 22 नोव्हेंबरपर्यंत जादा वाहतुकीचा कालावधी राहील.

एसटी सांगली विभागाकडून दिवाळीसाठी 87 जादा फेऱ्या

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : एसटीच्या सांगली विभागाने दिवाळीनिमित्त दहा आगारातून 87 जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. 11 ते 22 नोव्हेंबरपर्यंत जादा वाहतुकीचा कालावधी राहील.

कोरोनाच्या संकटामुळे एसटीचे मार्च ते एप्रिलअखेरचे भारमान वाढवा अभियान राबवता आले नाही. तसेच कोरोनामुळे एसटीला मोठा फटका बसला. अद्यापही पूर्वीइतकी शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू झालेली नाही; पण प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीनिमित्त प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन यंदाही जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

यंदा 8 ते 22 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी सार्वजनिक सुट्यांचा आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढू शकते. त्यामुळे दिवाळी सणाच्या महत्त्वाच्या तारखा विचारात घेऊन प्रवाशांना गावी आणि इच्छित ठिकाणी जाता यावे, यासाठी 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. 

प्रत्येक आगारात जादा फेऱ्यांचे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. तसेच दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला प्रवास फारसा केला जात नाही. त्यामुळे या दिवशी बस रिकाम्या धावू नयेत यासाठी जादा फेऱ्या स्थगित केल्या जाणार आहेत. जादा फेऱ्यांच्या कालावधीत चालक व वाहक यांच्या रजेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे; पण त्यांना आठवडा सुटी दिली जाईल.

गर्दीचा कालावधी लक्षात घेऊन आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षक यांना स्थानकावर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वेळी बस निर्जंतुक केल्या जातील. स्थानक परिसर व प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवली जातील. 

आगारनिहाय फेऱ्या 
जादा फेऱ्यांमध्ये सांगली आगारातून 9, मिरज 11, इस्लामपूर 10, तासगाव 10, विटा 10, जत 11, आटपाडी 6, कवठेमहांकाळ 12, शिराळा 4 आणि पलूस 4 याप्रमाणे सांगली विभागातून 87 जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी 145 चालक व 145 वाहक यांच्यावर जबाबदारी दिली जाईल. या काळात दररोज 37 हजार किलोमीटर अंतर जादा फेऱ्यांतून कापले जाईल. 
 

संपादन : युवराज यादव

loading image
go to top