पलूस तालुक्‍यात 896 कोरोनामुक्त; 525 रूग्णांवर उपचार सुरू 

संजय गणेशकर
Tuesday, 22 September 2020

पलूस तालुक्‍यातील रविवार पर्यंत असलेल्या एकूण 1 हजार 473 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 896 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पलूस : पलूस तालुक्‍यातील रविवार पर्यंत असलेल्या एकूण 1 हजार 473 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 896 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही दिलासादायक बाब आहे.तर कोविड रुग्णालयातील बिलाची धास्ती सर्वसामान्य व गरिब रुग्ण व नातेवाईक यांनी घेतली आहे. 

सुरूवातीला कोरोनाचे पार्श्वभूमीवर लॉंकडाऊन झालेपासून पलूस तालुक्‍यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. सुरूवातीला बाहेरून आलेल्या व होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मात्र, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पहायला मिळत आहे. 

तालुक्‍यात आतापर्यंत एकूण 1 हजार 473 कोरोना पॉंझीटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 52 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. समाधानकारक व दिलासादायक बाब म्हणजे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 896 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सद्या तालुक्‍यात 525 ऍक्‍टींव्ह रूग्ण आहेत. 

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे सद्या कोरोनाची कोणतीच लक्षणे नसणारे नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. सर्दी, खोकला, ताप असे नेहमीचे आजार असणाऱ्या नागरिकांचे अहवाल तर पॉझिटिव्ह ठरलेलेच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती बसली आहे. तालुक्‍यातील एकूण 525 अँक्‍टिव्ह रुग्णांपैकी जवळपास 480 रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात येऊन, त्यांना आरोग्य विभागाने घरीच औषधे दिली आहेत. 

बिलाची धास्ती 
कोरोनाबाबत प्रचंड भिती नागरिकांमध्ये आहे. त्यापेक्षाही आणखी भिती कोविड रुग्णालयातील उपचार आणि तेथील बिलाची भिती रुग्ण व नातेवाईक यांना आहे. आँक्‍सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. नाईलाजाने खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करावे लागत आहे. मात्र,सर्वसामान्य व गरिब रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाचे बिल भागविण्यासाठी धडपडत करित असल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 896 corona free in Palus; Treatment on 525 patients