सांगली जिल्ह्यात 9 हजार 111 नवे मतदार

विष्णू मोहिते
Tuesday, 2 February 2021

नवमतदार नोंदणी मोहिमेत सांगली जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 9 हजार 111 मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे.

सांगली : नवमतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 9 हजार 111 मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावनोंदणी जिल्हाभर राबवण्यात आली होती. नव्याने 24 हजार 753 मतदारांची नोंदणी झाली असली तरी त्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या नऊ हजार आहे. जिल्ह्याची मतदार संख्या 23 लाख 90 हजार 537 एवढी आहे.

1 जानेवारी 2021 ही अर्हता तारीख निश्‍चित करून 15 जानेवारी 2021 रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. 24 हजार 753 नवीन मतदारांची नोंद झाली आहे. 18 ते 19 वयोगटातील 9 हजार 111 मतदार आहेत. मृत्यू झालेले, कायम स्थलांतरीत व दुबार अशा 15 हजार 455 जणांची नावे वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादीत पुरूष 12 लाख 31 हजार 378, स्त्रीया 11 लाख 59 हजार 89, तृतीय पंथी 70 असे 23 लाख 90 हजार 537 मतदार आहेत. मतदार यादी ceo.maharashtra.gov.in व sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर म्हणाले,""लोकशाहीवर असणारी निष्ठा दृढ करण्यासाठी राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार पार पाडण्याची अमूल्य संधी आहे. मतदान करताना गुणवत्ता आधारीत मतदान व्हावे. ज्यांची नावे मतदार यादीत नोंद झालेली नाहीत अशांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहीत करावे. ग्रामीण भागात मतदानाचा टक्का शहरी भागापेक्षा जास्त असतो. शहरी भागातील मतदानाची टक्केवारीही वाढावी यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. इपिक कार्डाची पीडीएफ कॉपी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचाही लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मतदानाचा अधिकार अमूल्य

भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य आहे. सशक्त लोकशाहीसाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रीय भाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य बजावावे.

- डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी 
 
संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 thousand 111 new voters in Sangli district