औषधी बिया निर्यातीच्या आमिषाने 94 लाखांची फसवणूक; पलूसमधील प्रकार

94 lakh fraud in the lure of medicinal seed exports in Palus
94 lakh fraud in the lure of medicinal seed exports in Palus
Updated on

पलूस : सालव्हिया सीडस्‌ अमेरिकेत निर्यात करण्याचा भागिदारीत व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवत तब्बल 94 लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सावंतपूर वसाहतीतील (ता. पलूस) मझहर अमिनुद्दीन पटेल (वय 45) यांनी आज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या बियांचा वापर विषाणू संसर्ग विरोधी लस बनवण्यासाठी उपयोग होत असल्याची थाप भामट्यांनी मारली होती. त्याला श्री. पटेल फसले.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, श्री. पटेल यांना सर्वात प्रथम अशा बियांच्या आयातीचा व्यवसाय करण्यासाठी ई-मेल द्वारे विचारणा झाली. त्यासाठी आयात निर्यात कंपनीत भागीदारीसाठी त्यांना ऑफर देण्यात आली. 17 जुलै ते 19 ऑगस्ट 2020 या कालावधीत पटेल यांचा याबाबत सतत इमेल संपर्क सुरू होता. संसर्ग प्रतिबंधक लस बनवण्यासाठी या बियांचा उपयोग होणार असून, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात अमेरिकेत त्याची मोठी मागणी वाढणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. बियांचा पुरवठा भारतामधून सुरू करण्यासाठी भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवले होते. तसे अमेरिकेतून ई-मेल त्यांना पाठवले होते. त्यासाठी अमेरिकन कंपनीकडून त्यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यावर पैसे भरावेत, असे सांगण्यात आले. 

व्यवसायाचा भाग म्हणून त्यांनी 17 जुलैला नवी मुंबईतील मनोज इंटरप्रायझेसमधून अडीच किलो बिया खरेदी केल्या. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यावर रक्‍कम भरण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा 50 किलो बिया खरेदी करण्यास सांगितले. पुन्हा रकमा बॅंक खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. या व्यवहारानंतर गेल्या 19 ऑगस्टला एक इसम खासगी गाडीने पटेल यांच्याकडे सावंतपूर येथील घरी आला. त्याने झालेल्या व्यवहारापोटी अमेरिकन डॉलरमध्ये रक्कम आणली असल्याचे सांगितले. त्याने आपण स्टॅंडर्ड बॅंक ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे सांगितले व बॅगेतून आणलेली रक्कमही दाखवली. त्या सर्व नोटा काळ्या कोटिंगमध्ये होत्या.

या व्यवसायाच्या भागीदारीपोटीची रक्कम ते अमेरिकन डॉलर्समध्ये देणार होते. त्यांनी त्या बॅगमधून दोन नोटा बाहेर काढल्या. त्या केमिकलमध्ये बुडवून स्वच्छ केल्या. मात्र अन्य नोटा धुण्यासाठी अडचणी येत असून केमिकलमध्ये थोडी खोट आहे. नव्याने केमिकल आणतो, असे सांगून त्यांनी ती बॅग पटेल यांच्या घरीच ठेवली आणि पळ काढला. तो पुन्हा न आल्याने त्यांना आपली पुरती फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

याप्रकरणी पोलिसांनी आज किम डेविड (ए. ए. एच. फार्मास्युटीकल लि. कंपनी, युनायटेड किंगडम), डॅनियल (स्टॅंडर्ड चार्टर बॅक इंडिया, नवी दिल्ली), मनोज इंटरप्रायझेस (नवी मुंबई), व्हीरल एच, हॅकुम. उमर राजा मुजुमदार, अरुण चकमा, सुधीता चकमा, गीवाकुमार रियांग, सुमित बुस, दयाप्रसाद मिश्रा, बिशाना देवराना, पागधींग आऊशी अशा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पटेल यांनी ही नावे संवादादरम्यान आल्याचे सांगितले. त्यांच्या सर्व बॅंक खात्याच्या व्यवहाराची चौकशी केल्यानंतर त्यांनी तब्बल 94 लाख 9 हजार 300 रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यावर भरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीसह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव तपास करीत आहेत. 

बिया इतक्‍या महाग नाहीत
सालव्हीया तुळस कुळातील झुडूप वर्गीय वनस्पती आहे. त्याच्या बिया सब्जासारख्या असतात. त्या रोगप्रतिकारक, जंतुनाशक, कृमीनाशक आहेत. भारतात त्या मुबलक प्रमाणात आढळतात. बागेत शोभीवंत म्हणून त्यांचा वापर होतो. या बिया इतक्‍या महाग नाहीत. सालव्हीनिया ही जलचर वनस्पती आहे. केंदाळाप्रमाणे ती पाण्यात वाढते. तिचे गुणकारी उपयोग नाहीत. फसवणुकीचा प्रकार नेमक्‍या कोणत्या वनस्पतीबाबत झाला आहे समजून येत नाही. प्रत्यक्ष बिया पाहिल्यानंतरच त्यावर बोलता येईल. 
- प्रा. पी. एम. सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com