जिल्ह्यात ९५५ क्विंटल हळद बियाणे उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेले हळदीचे बियाणे.

सांगली : जिल्ह्यात ९५५ क्विंटल हळद बियाणे उपलब्ध

सांगली - जिल्ह्यात हळद लागवड अक्षयतृतीयेपासून केली जाते. यंदा ३ मेपासून लागवडीला सुरुवात होईल. त्यामुळे बाजार समितीत हळदीचे बियाणे विक्रीस आले आहे. सध्या १५० टन बियाण्यांची आवक झाली असून, हळद संशोधन केंद्रात ८०५ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या हळदीच्या बियाण्यांची मागणी कमी असली, तरी येत्या १५ दिवसांत हळद उत्पादक शेतकरी बियाणे खरेदीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे.

बाजार समिती ही हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. राज्यासह परराज्यांतून हळद विक्रीसाठी शेतकरी येथे येतात. त्याचप्रमाणे हळदीचे बियाणे खरेदी करण्यासाठीही शेतकरी येतात. दरवर्षी बाजार समितीत ४०० ते ५०० टन बियाण्यांची आवक होते. हे बियाणे खरेदी करण्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांसह महाराष्ट्रातून सांगलीतील शेतकरी या बाजार समितीत येतात. सध्या बाजार समितीत १०० ते १५० टन बियाण्यांची आवक झाली आहे. मात्र, उन्हाळी पाऊस झाल्याशिवाय हळदीचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी पुढे येत नसल्याची माहिती बियाणे व्यापाऱ्यांनी दिली.

दरम्यान, कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्रातही दरवर्षी हळदीचे बियाणे विक्रीस उपलब्ध केले जाते. दोन वर्षांपूर्वी महापुराने संशोधन केंद्रातील बियाणे खराब झाले होते. गेल्या वर्षी महापूर आला असला, तरी महापुराच्या तडाख्यातून बियाणे वाचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध झाले होते. यंदा हळद संशोधन केंद्रात ८०५ क्विंटल बियाणे उपलब्ध असून, बियाण्यांच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे संशोधन केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.

नदीकाठी हळद लागवड होणार काय?

अक्षयतृतीय पुढच्या महिन्यात आहे. त्यामुळे हळद लागवडीसाठी शेतकरी तयारी करू लागला. मात्र, गतवर्षी अतिवृष्टी आणि महापुराचा फटका नदीकाठच्या गावाला बसला होता. त्यामुळे या गावातील हळदीचे नुकसान झाले होते. सलग दोन वर्षे महापुराचा फटका बसल्याने यंदा नदीकाठचे शेतकरी लागवडीसाठी पुढे येणार का, असा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे.

Web Title: 955 Quintals Of Turmeric Seeds Available In Sangli District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..