
-शिवाजी चौगुले
शिराळा : ‘अरण्यऋषी’, पद्मश्री दिवंगत मारुती चितमपल्ली सांगायचे, वानरांमध्ये प्रेमभावना, कुटुंब वत्सलता सर्वाधिक असते. त्याचं दर्शन आज शिराळा मुक्कामी घडलं. एका अपघातात जखमी आईनं स्वतःचा जीव गमावून आपल्या पिलाचं रक्षण केलं. तिनं प्राण सोडला. पिलानं आई गमावली. पोरक्या पिलाला गावातील एका प्राणिमित्रानं घरात नेलं. बाटलीतून दूध दिलं... मादी वानराच्या मृत्यूनंतर वानर टोळी झाडावर बसून होती. सकाळी ‘त्या’ पिलाला त्यांना उचलून झाडावर नेलं. त्याला कुठं लागलंय का पाहिलं अन् लगेच एका मादी वानराकडे सोपवून त्याच्या स्तनपानाची सोय केली. ते पिलू तिला बिलगलं. माणूस आणि निसर्ग यांनी हातात हात घालून पुढं गेलं तर दुःखावर, संकटावर मात करता येते, याचं दर्शन यातून घडलं.