esakal | अफलातून ; ऊसतोड मजूर छायाताईंची काव्यप्रतिभा
sakal

बोलून बातमी शोधा

 Aalsand Sugar Cane Laborer Women Poetry Sangli marathi  News

काबाडकष्टातही शब्दकळा जपणाऱ्या छायाताई ऊसतोड मजूर महिलेची थक्क करणारी प्रेरणादायी काव्यप्रतिभा.. 

अफलातून ; ऊसतोड मजूर छायाताईंची काव्यप्रतिभा

sakal_logo
By
दीपक पवार

आळसंद (सांगली) :
                           दारूच्या गुटख्यात 
                           वरळीच्या मटक्‍यात 
                           माझा संसार बिघडला 
                           बाई माझा संसार बिघडला 
                           मणी नाही गळ्यात फुटका 
                           माझ्या जीवाला लागलाय चटका... 

या काव्यओळी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्‍याच्या छायाताई प्रभाकर पठाडे यांच्या तोंडून ऐकल्या. आणि बहिणाबाई चौधरींच्या काव्य ओळींचीच आठवण झाली. सध्या त्या ऊसतोडीसाठी येरळा काठावरील बलवडी भा. (ता. खानापूर) भागात आल्या आहेत. छायाताई निरक्षर आहेत. लहानांपासून त्यांना शब्दांची ओढ. त्या मनोमन कविता करायच्या आणि ऐकवायच्या. वडील तुकाराम कांबळे पुसदच्या मिल मध्ये फिटर म्हणून काम करायचे. ते उत्तम भजन म्हणायचे. त्यांचा कळत न कळत प्रभाव छायाताईंच्या बालमनावर होत होता.

हेही वाचा - भाऊ खालू बाजा म्हणजे काय रे.. ?
 

कारखान्याच्या ऊसतोडीसाठी जिल्ह्यात

आईचं अपघाती निधन झालं. त्यामुळे शिक्षण सुटलं ते कायमचं. छायाताई यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कविता, गाणी, गवळण, भजन गाऊ लागल्या. लोकांना भुरळ पडली. भजन सप्ताह, गणेश मंडळ, यासह विविध ठिकाणी कार्यक्रम होऊ लागले. मान - सन्मान मिळाले. पण धन मिळाले नाही. या परिस्थितीत लग्न झाले. पती, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सध्या त्या उदगिरी साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी जिल्ह्यात आल्या आहेत. 

छायाताईंच्या अनेक कविता अंतर्मुख करणाऱ्या आहेत. त्यांच्या कविता विभक्त कुटुंबपद्धतीवर नेमके भाष्य करतात. व्यसनाचे दुष्परिणाम सांगतात. त्या उत्तम गेयरुपात कविता सादर करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची महती सांगताना त्या म्हणतात, 
            'वर्गाच्या बाहेर बसून शिकला 
                   भीम शाळा... 
           म्हणूनच आला तुम्हाला तिसरा डोळा.. 
          आता तरी येऊ द्या, तुम्हाला थोडं ग्यान 
          भीमानं वाढवली, तुमची शानं..'' 

हेही वाचा - पर्यटकांनी मंडणगडकडे का फिरवली पाठ ?


लेखन लिखित स्वरुपात येणे गरजेचे

दिवसभराचे काबाडकष्टानंतरही त्या समाज प्रबोधनाचे शब्द लिहतात. हा वसा तो नेटाने पुढे नेत आहेत. त्यांचे लेखन लिखित स्वरुपात नाही. सारे त्यांना तोंडपाठ आहे. ते ग्रंथरुपाने प्रसिद्ध व्हायला हवे. आजवर त्यांना फक्त मानच मिळाला आहे. मनोहर नाईक, विष्णू शिंदे, माणिकराव ठाकरे अशा मान्यवरांनी त्यांचा सत्कार केल्याचे ते सांगतात. विविध पारितोषिकांनीही त्यांचा सन्मान झाला. मात्र त्यांच्या वाट्याचे कष्ट कमी झाले नाहीत. ही त्यांची व्यथा कोण समजून घेणार? 

.  

loading image
go to top