आईला सांभाळलं तर नाहीच, वरुन दागिनेही चोरले; सांगलीत ४० वर्षांच्या मुलाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आटपाडी येथील विठलापूर येथे 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे दहा दिवसांपूर्वी अज्ञाताने घर फोडी करून सात ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आणि आठ हजार रुपयांवर डल्ला मारला होता.

Aatpadi Crime : आईला सांभाळलं तर नाहीच, वरुन दागिनेही चोरले; सांगलीत ४० वर्षांच्या मुलाला अटक

आटपाडी - आटपाडी येथील विठलापूर येथे 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे दहा दिवसांपूर्वी अज्ञाताने घर फोडी करून सात ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आणि आठ हजार रुपयांवर डल्ला मारला होता. या चोरीचा आटपाडी पोलिसांना छडा लावण्यात यश आले असून ही चोरी त्या वृद्धेचा सांभाळ न करणाऱ्या मुलानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हणमंत नाना बाड वय. 40 असे या चोरट्याचे नाव आहे.

बाबाबाई नाना बाड (वय ७५) ही वयोवृद्ध महिला विठलापूर येथे भवानीनगर मध्ये एकटीच राहते. तिला हणमंत बाड नावाचा चाळीस वर्षे मुलगा आहे. तो आईचा सांभाळ न करता आईच्या घराशेजारीच विभक्त राहतो. 75 वर्षीय ही वयोवृद्ध महिला चार-पाच शेळ्या आणि कोंबड्या पाळून उदरनिर्वाह करते. 13 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे ती पत्र्याच्या घराला कुलूप लावून शेळ्या घेऊन चारण्यासाठी म्हणून गेली होती.

सायंकाळी घरी आल्यानंतर तिच्या घराला कुलूप नसल्याचे लक्षात आले. घरात पत्र्याची पेटी तपासल्यावर त्यामध्ये असलेली सात ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आणि आठ हजार रुपयेही नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने याची शेजाऱ्यांना माहिती दिली. अनेकाकडे चौकशी केली पण काहीच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला इतरांच्या सल्ल्याने तिने आटपाडी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. त्यानंतर आटपाडी पोलिसानी तपास सुरू केला.

पोलिसांना या वयोवृद्ध महिलेच्या मुलानेच चोरी केली असल्याची गुप्त माहिती लागली. त्या आधारे त्याने हणमंत बाड याच्याकडे चौकशी सुरू केली. चौकशीत चंद्रकांत बाड याच्याच खिशात सात ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आढळून आली. त्यामुळे त्यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले आणि कबूलही केले आहे. मुलानेच आईच्या सोन्याची चोरी केल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या चोरी प्रकरणी चंद्रकांत बाडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.