Aatpadi News : श्रावणातील भक्तिरंग : डोंगर, घळीच्या कुशीतलं ‘शुकाचार्य’

आटपाडी - भाविकांचे श्रद्धास्थान आणि दुष्काळी भागातील ‘ओयासिस’ म्हणून ओळखले जाणारे शुकाचार्य स्थळाची राज्यभर ओळख आहे.
Religious Place Shukacharya
Religious Place ShukacharyaSakal

श्रावण मासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... ऊन-पावसाचा खेळ, हिरवळीचा शालू नेसलेले डोंगर, भक्तिभावाने न्हाऊन निघालेले प्रसन्न वातावरण, व्रतवैकल्य आणि पूजाविधीने वातावरणात दरवळलेला उल्हास... श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना.

भगवान शंकराची पूजा मनोभावे केली जाते. दर सोमवारी यात्रा भरतात. भक्तिरंगात न्हाऊन सारे तल्लीन होतात. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या काळात भक्तांचा महापूर येतो. अशाच काही श्रावण भक्तिरंगात रंगणाऱ्या स्थळांची माहिती आजपासून...

आटपाडी - भाविकांचे श्रद्धास्थान आणि दुष्काळी भागातील ‘ओयासिस’ म्हणून ओळखले जाणारे शुकाचार्य स्थळाची राज्यभर ओळख आहे. इथे श्रावण महिन्यात दर सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते.

व्यास मुनीचे पुत्र शुक यांनी तपस्या केलेले हे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. त्यांनी तपस्या करण्यासाठी हे ठिकाण निवडले होते. त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने अप्सरा, रंभा पाठवली होती. ब्रह्मचारी असलेले शुकाचार्य अप्सरा पाहून डोंगरात गेले आणि त्यांची पाठमोरी आकृती आजही दिसते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. राज्य सरकारने हे ठिकाण विकसित केले आहे. हिवतडवरून वर आणि बाणूरगडवरून खाली येण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिर, भांडारगृह, विश्रांतीगृह अशी कामे येथे झाली आहेत.

येथे गोशाळा चालवली जाते. आजही भक्त तपस्या करतात. शुकाचार्य परिसर हिवतड ग्रामपंचायत हद्दीत आहे. आटपाडी आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर हे ठिकाण आहे. धार्मिक आणि निसर्गसौंदर्याने नटलेले स्थळ भाविक आणि पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आले आहे. साधारण ५०० एकर क्षेत्रावर परिसर विस्तारला आहे. इथे शंभरावर विविध प्रकारची झाडे आणि औषधी वनस्पती आढळतात.

अनेक प्रकारचे पशु-पक्षी आणि प्राणीही आढळून येतात. पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने श्रावण महिन्यात परिसर हिरवाईने नटलेला असतो. डोंगरातून पाणी वाहत येते. कितीही दुष्काळ पडला तरी येथील जलकुंभ कधीही कोरडा पडत नाही. गर्द सावली, वाऱ्याची झुळुक असे वातावरण असते.

कसे याल?

विटा ते जत राज्य मार्गावरील बाणूरगडपासून तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आटपाडी- गोमेवाडी -हिवतड. कोळा-बाणूरगड. तासगाव- जरंडी- शुकाचार्य. कवठेमहांकाळ-घाटनांद्रे- बाणूरगड- शुकाचार्य असे मार्ग आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com