esakal | सांगलीत मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; 'ACB'ची धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe

लाच मागितल्याबद्दल तक्रारदार यांनी २८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

सांगलीत मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; 'ACB'ची धडक कारवाई

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : जमिनीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी ७० हजार रूपये लाच मागून पहिला हप्ता २५ हजार रूपये स्विकारताना मंडल अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मंडल अधिकारी श्रीशैल उर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६ रा. शिवाजीनगर, मालगाव ता. मिरज) आणि संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार (वय ३६, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) याला अटक केली. (ACB Action)

सांगलीतील राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. (sangli breaking) लाचखोरांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी, तहसिल कार्यालय मिरज येथे पुरवठा अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या श्रीशैल घुळी याच्याकडे कुपवाड, सांगली व बुधगावचा मंडल अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. (sangli news) परिसरातील एका तक्रारदार यांची आई वारसदार असलेल्या जमिनीच्या संदर्भातील तक्रारीची सुनावणी घुळी याच्यासमोर सुरू आहे. या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी घुळी व त्याच्या कार्यालयातील ऑपरेटर जमादार याने ७० हजार रूपये लाचेची मागणी केली. लाच मागितल्याबद्दल तक्रारदार यांनी २८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा: खवलेमांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद; धोपावेतील प्रकार

लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी २९ व ३० ऑगस्ट आणि १ व २ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा जमिनीसंदर्भातील तक्रारीचा निकाल बाजूने लावण्यासाठी मंडल अधिकारी घुळी याच्या सांगण्यावरून ऑपरेटर जमादार याने ७० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी २५ हजार रूपये पहिला हप्ता म्हणून द्यायचे तसेच उर्वरीत ४५ हजार रूपये निकाल लागल्यानंतर देण्यास सांगितल्याचेही निष्पन्न झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात आज सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे ऑपरेटर जमादार याने लाचेची मागणी करून २५ हजार रूपये स्विकारल्यानंतर त्याला तत्काळ पकडण्यात आले. तसेच घुळी यालाही अटक केली. दोघांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: औषधे घ्यायचे विसरताय? मिळेल आता सूचना ; निखिल पडतेंचे संशोधन

पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, कर्मचारी अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रितम चौगुले, भास्कर भोरे, राधिका माने, विणा जाधव, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

loading image
go to top