esakal | डाळिंब बागांच्या छाटणीला आटपाडी परिसरात वेग

बोलून बातमी शोधा

Accelerate pruning of pomegranate orchards in Atpadi area

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची मृग बहार धरण्यासाठी छाटणी, चाचरणे आणि अंतर्गत मशागतीची पूर्वतयारी जोमात चालू झाली आहे. 

डाळिंब बागांच्या छाटणीला आटपाडी परिसरात वेग

sakal_logo
By
नागेश गायकवाड

आटपाडी : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची मृग बहार धरण्यासाठी छाटणी, चाचरणे आणि अंतर्गत मशागतीची पूर्वतयारी जोमात चालू झाली आहे. 

आटपाडी तालुक्‍यात डाळिंबाचे 15 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. गतवर्षी मध्ये अतिवृष्टीमुळे बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अंदाजे चार ते पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आंबे बहार धरला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मृग बहार धरण्यासाठी पूर्वतयारी चालू केली आहे. सध्या भागांचे पाणी बंद करून ताणावर सोडल्या आहेत. 

डाळिंबाची छाटणी सुरू केली असून वेग आला आहे. छाटणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बलवडी, कोळा, नागज या भागातील मजूर गाड्या करून मोठ्या संख्येने तालुक्‍यात येऊ लागलेत.

छाटणीनंतर बागेतील कचरा बाहेर काढणे, झाडाच्या खोडांना पेस्ट लावणे, चाचरणे, शेण व वरखाते आणि बेड करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. दोन महिन्यात कामे करण्याचे नियोजन आहे. छाटणी करून बोर्डोची फवारणी केली जाते. उन्हाचा कडाका वाढू लागल्यामुळे छाटणी मजुरांनी कामाच्या वेळात बदल केला आहे. 

उन्हाचा कडाका... कामाची वेळ बदलली 
उन्हाचा कडाका वाढू लागल्यामुळे छाटणी मजुरांनी कामाच्या वेळा बदलल्या आहेत. पहिल्या सत्रात सकाळी सहा ते अकरा अशी वेळ ठेवली आहे. त्यासाठी चारशे रुपये मजुरी दर आहे. दुपारच्या सत्रात तीन ते सायंकाळी सहा वेळात छाटणी केली जाते. त्यासाठी अडीचशे रुपये मजुरी दर आहे. अशीच कामाची वेळ शेणखत घालणाऱ्या मजुरांनी केली आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही बागातील कामाच्या वेळा बदलल्या आहेत. 

शेणखताला सोन्याचा भाव 
तालुक्‍यात फळबागांचे क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे शेणखताचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी एका ट्रॉलीचा भाव आठ हजारावर पोहोचला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरातून दररोज पाच-पंचवीस ट्रॅक्‍टर शेणखत विक्रीसाठी आटपाडीत येऊ लागले आहे. ग्रामपंचायत परिसरामध्ये शेणखत ट्रॅक्‍टर विक्रीसाठी उभा असतात. तेथून शेतकरी खरेदी करून बागेमध्ये घेऊन जातात. 


संपादन : प्रफुल्ल सुतार