
अथणी : भावाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या एकाचा मृत्यू
अथणी: येथील चुलत भावांचा विचित्ररीत्या दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. एकाने विजापुरात आत्महत्या केली तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्याहून येणाऱ्या चुलत भावाचा कागवाड तालुक्यात मंगसुळीजवळ अपघात होऊन मृत्यू झाला. अभिषेक मल्लिकार्जुन गोटखिंडी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या, तर उदय शिवशंकर गोटखिंडी (वय ३६) असे अपघाती मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अभिषेक मल्लिकार्जुन गोटखिंडी याला ऑनलाईन रमी गेमचे व्यसन जडले होते. या नादात तो कर्जबाजारी झाला होता. त्याने लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. ते भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी तगादा लावून शिवीगाळ केली. त्यामुळे ही बाब मनाला लावून घेऊन त्याने विजापुरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी गोलघुमट पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.
आपला चुलत भाऊ अभिषेक
याचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे येथे खासगी कंपनीत काम करीत असलेल्या उदय शिवशंकर गोटखिंडी याला समजली. आपल्या चुलत भावाच्या अंत्यसंस्कारासाठी शुक्रवारी (ता. ६) येण्यास निघाला. मात्र वाटेत रात्री कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावाजवळ झालेल्या अपघातात त्याचाही मृत्यू झाला. कागवाड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. या चुलत भावांच्या मृतदेहांवर एकाच ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
अभिषेक गोटखिंडी व उदय गोटखिंडी या चुलत भावांवर काळाने विचित्र पद्धतीने घाला घातला. त्यामुळे गोटखिंडी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांना एकदम काळाने हिरावून गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.