esakal | कोसळणारी भिंत पाहताना झाला घात; कुटुंबाचं घराचं स्वप्न अधुरचं
sakal

बोलून बातमी शोधा

crime case

घराचे काम पूर्ण होईपर्यंत राहण्यासाठी त्यांनी बाजूच्या खुल्या जागेत पत्र्याचे शेड उभारले होते.

कोसळणारी भिंत पाहताना झाला घात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बडाल अंकलगी (ता. बेळगाव) बुधवार सायंकाळी घडलेल्या घटनेने वातावरण सुन्न झाले आहे. तसेच खनगावी कुटुंबियांचे नवीन घरकुल उभारण्याचे स्वप्नही अधुरेच राहिले. सायंकाळच्या दरम्यान खनगावी कुटुंबीय शेतातून घरी परतले. सहाजण पत्र्याच्या शेडमध्ये चहा पीत बसले होते. त्यावेळी भिंत कोसळू लागल्याने बाहेर येऊन कोसळणारी भिंत पाहत थांबले होते. शेजारील मुलगीही तिथे येऊन थांबली. मात्र, क्षणार्धात मातीची मोठी भिंत त्यांच्या अंगावर कोसळली अन् सातजण ठार झाले.

अर्जुन आणि त्यांचा मोठा भाऊ भिमाप्पा दोघे आपल्या कुटुंबांसह एकाच घरात राहत होते. जुने घर जीर्ण झाल्याने नवीन घर बांधण्यासाठी दोघा भावांनी दोन दिवसांपूर्वी जुन्या घराचे छत हटवले होते. तसेच एका बाजूची भिंतही पडली होती. घराचे काम पूर्ण होईपर्यंत राहण्यासाठी त्यांनी बाजूच्या खुल्या जागेत पत्र्याचे शेड उभारले होते. बुधवारी मुख्य भिंतही पाडण्यात येणार होती. पण, अमावस्या असल्याने काम बंद ठेवून सर्वजण शेतात गेले होते.

हेही वाचा: 'पीएन साहेब मी तुमचाच! मला तुमच्याबरोबरच राहायचं होतं पण...'

दिवसभर शेतात काम करून ते सायंकाळच्या दरम्यान घरी परतले. अर्जुन हणमंत खनगावी (वय ४५), गंगव्वा भिमाप्पा खनगावी (वय ५०), सत्यव्वा अर्जुन खनगावी (वय ४५), पूजा अर्जुन खनगावी (वय ८), सविता भिमाप्पा खनगावी (२८), लक्ष्मी अर्जुन खनगावी (वय १५) सहाजण शेडमध्ये चहा पीत बसले होते. अर्जुन यांचा मोठा भाऊ भिमाप्पा व त्यांचा सोळावर्षीय मुलगा काही कामानिमित्त गावात गेले होते.

दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे मातीची भिंत भिजली होती. त्यातच आदल्या रात्री मुसळधार पाऊसही झाला होता. चहा पिताना पूजाचे लक्ष कोळणाऱ्या भिंतीकडे गेले. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे, सर्वजण भिंतीकडे पाहत उभे राहिले होते. आरडाओरड ऐकून शेजारील काशव्वा विठ्ठल होळेप्पण्णावरही (८) तिथे येऊन उभी राहिली. भिंत आपल्या अंगावर कोसळेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. अवघ्या एका सेकंदात भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि त्याखाली सापडून सात जण मृत्युमुखी पडले. मृतदेहावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: खून प्रकरणी श्री राम सेना हिंदुस्थानच्या खानापूर तालुका प्रमुखासह 10 जण गजाआड

दोघे ठरले सुदैवी

भिमाप्पा आणि त्यांचा मुलगा या दुर्घटनेतून बचावले आहेत. त्यांनी अलीकडेच आपल्या मोठ्या मुलीचा विवाह चिक्कोडीला करुन दिला आहे. एकूण नऊ जणांच्या कुटुंबातील सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top