
बेळगाव : अपघातात लष्करी जवान जागीच ठार
बेळगाव : भरधाव मोटारीची रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक बसून कार शेतात पलटी झाल्याने भावाच्या लग्नानिमित्त सुट्टीवर आलेला बेळगुंदीचा लष्करी जवान जागीच ठार झाला. सोमवारी (ता.११) रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान दरम्यान बेळगुंदी रोडवरील बोकनूर क्रॉस नजीक हा अपघात घडला. ओमकार महादेव हिंडलगेकर (वय २१ रा. कलमेश्वर गल्ली बेळगुंदी) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून ओमकारच्या पार्थीवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ओमकार हा गेल्या अडीच वर्षापासून भारतीय लष्करी सेवेत कार्यरत असून तो सध्या अहमदनगर येथे सेवा बजावत होता. त्याच्या मोठ्या भावाचे लग्न होते. त्यामुळे तो गेल्या २० दिवसापूर्वी रजेवर आला होता. त्याने कडोली येथील आपल्या मामाची कार आणली होती.
की कार पुन्हा मामाला देण्यासाठी तो रात्री ११.३० ते १२ दरम्यान कार घेऊन कडोलीला जाण्यासाठी निघाला होता. काल रात्री जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही. भरधाव मोटारीवरील त्याचा ताबा सुटल्याने बोकनूर क्रॉसजवळ भरधाव मोटारीची रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यानंतर कार शेतात जाऊन पलटी झाली. अपघातात जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. आज सकाळी ६ च्या दरम्यान एक मोटार रस्त्याच्या कडेला जाऊन शेतात पलटी झाल्याचे काहींच्या निदर्शनास आले. ही माहिती गावात समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ओमकार हा मोटारीत अडकून पडला होता. त्याची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

अपघाताची माहिती समजतात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ही माहिती मराठा लाईट इन्फंट्रीला कळविण्यात आली. त्यानंतर लष्करी अधिकारी गावात दाखल झाले. शासकीय इतमामात ओंमकारच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे अमर रहे ओमकार अमर रहे, भारत माता की जय, जय जवान जय जवान अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून यावेळी उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले. ओमकार हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई वडील बहिण भाऊ असा परिवार असून अठरा दिवसापूर्वी त्याच्या मोठ्या भावाचा विवाह झाला आहे. भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: Accident News Loss For Country Soldier Was Killed On The Spot In Accident Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..