
जखमींना स्थानिक लोकांनी इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्गावर दत्त भुवन जवळ झालेल्या अपघातात चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक पुरुष व एक महिला ठार झाली. लग्नासाठी मुलगी पहाण्याला पुण्याला निघालेल्या कुंभार कुटूंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात सुमो कारचा चक्काचूर झाला असून जखमींना स्थानिक लोकांनी इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबतीत कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अंकली (ता. मिरज) येथील एकाच कुटूंबातील ११ लोक मुलगी पाहण्यासाठी पुणे येथे (सुमो क्र. एम. एच. १० बी. ए. ६३९७) मधून आशियाई महामार्गावरून जात असताना हॉटेल दत्त भुवन येथे आले असता, गाडीचा टायर फुटला आणि गाडी महामार्गाच्या शेजारील ओढ्याच्या दिशेने पाचशे फुटावर जाऊन पलटी झाली. हा भीषण अपघात घडताच स्थानिक लोकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात पाठवून दिले.
हेही वाचा - अजित दादांच्या मतावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया वाचा सविस्तर -
या अपघातामध्ये गाडीचा चालक श्रीकांत आण्णापा कुंभार (वय ५०) (रा. अंकली ता. मिरज) व स्वप्नाली प्रमोद कुंभार (वय ३५) रा. इचलकरंजी ता. हातकणंगले हे दोघे ठार झाले तर या अपघातात पंकज सुनिल कुंभार (२९), सुरेखा सुनिल कुंभार (४२), सुनिल मल्लापा कुंभार (५२), प्रकाश मल्लापा कुंभार (४०), अरुण मल्लापा कुंभार (४०), गीतांजली अरुण कुंभार ( ३८), निलम श्रीकांत कुंभार (३६) सर्व रा. कुंभार गल्ली अंकली ता. मिरज मयूर प्रमोद कुंभार (१२) रा. इचलकरंजी ता. हातकणंगले व सदाशिव मारुती कुंभार(५६) रा. बेडग्याहळ ता. चिक्कोडी हे जखमी झाले आहेत.
सदर अपघाताचा तपास हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. याबाबत मोटर अपघात पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
हेही वाचा - पवार यांनी राणेंपासून धोका का ? असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली
संपादन - स्नेहल कदम