क्षणात झाले होत्याचे नव्हते ; महिला पीएसआयसह कुटुंबावर काळाचा घाला

महेश काशीद
Sunday, 24 January 2021

सौंदत्ती तालुक्‍यातील चचडीजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे.

बेळगाव : महिला पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकांसह चौघेजण ठार झाले. मृतांमध्ये पोलिस उपनिरीक्षकांसह त्यांचा मुलगा, सून आणि सख्ख्या बहिणीचा समावेश आहे. सौंदत्ती तालुक्‍यातील चचडीजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे.

लक्ष्मी हणमंतराव नलवडे (पवार) (रा. सह्याद्रीनगर) असे महिला पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मुलगा प्रसाद वासूदेव पवार, सून अंकिता प्रसाद पवार, बहिण दिपा अनिल शहापूरकर (सर्व रा. सह्याद्रीनगर) अशी मृतांचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पोलिस उपनिरीक्षक नलवडे लग्नानिमित्त दोन दिवसांच्या सुटीवर निघाल्या होत्या. लग्न उरकून त्या घरी परतत होत्या. पण, तिकडून येत असताना सौंदत्ती येथे रेणुका देवीचे दर्शन घेण्याचे नियोजन त्यांनी केले. मात्र चचडीजवळ पोचल्यानंतर कार व बसचा भीषण अपघात झाला. बस कारवर आदळली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. यामुळे कारमधील चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. 

हेही वाचा - सेवानिवृत्तीनंतर ते आठ दिवसांपूर्वी मूळ गावी मेलमट्टीत आले होते

बस बेळगावहून यरगट्टीकडे जात होती. तर पोलिस उपनिरीक्षक कारने सौंदत्तीहून बेळगावकडे येत होत्या. त्यामध्ये बसखाली सापडलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट दिली. मुरगोड पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident in saundatti road belagan four people dead in accident