आरोपी जेल तोडून पळाले ः हे बघत बसले, सीसीटीव्हीऐवजी टीव्ही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

कर्जत येथील दुय्यम कारागृहाच्या छताचे प्लायवूड कापून पाच आरोपी पळाले होते. त्यांच्यावर खून, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पळाले होते. त्यांतील तिघांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, पळून जाण्याअगोदर हे आरोपी चार दिवस छत तोडण्याचा प्रयत्न करीत होते.

नगर : कर्जत येथील उपकारागृहाचे छत कापून पाच आरोपी पळाले होते. त्यातील तिघांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. मात्र, त्या वेळी ड्युटीवरील पोलिस कर्मचारी टीव्ही पाहत बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. या बाबतचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

पोलीस मोबाईलमध्ये बिझी असल्यानेच... 
कर्जत येथील दुय्यम कारागृहाच्या छताचे प्लायवूड कापून पाच आरोपी पळाले होते. त्यांच्यावर खून, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पळाले होते. त्यांतील तिघांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, पळून जाण्याअगोदर हे आरोपी चार दिवस छत तोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी रात्रीऐवजी दिवसाची वेळ ठरवली होती. दिवसा ड्युटीवर असलेले कर्मचारी टीव्ही पाहत अथवा मोबाईलमध्ये मग्न असत. टीव्हीच्या आवाजामुळे बराकीत आरोपी काय करतात, याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. ही गोष्ट हेरूनच आरोपींनी छत कापण्यास सुरवात केली. 

कारवाईकडे लागले लक्ष 
छत कापून झाल्यानंतर चादरीच्या साह्याने छतावर चढून बाहेर उड्या मारून आरोपी पसार झाले. उपकारागृहाच्या पाठीमागे पोलिस वसाहत आहे. तेथूनच आरोपी पळून गेले. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी खातेनिहाय चौकशी केली असून, हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. आता ड्युटीवरील कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. 

अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठवलाय 
चौकशीत चारही कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. हा अहवाल आज पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. 
- संजय सातव, उपअधीक्षक, कर्जत विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused fled jail: Police watching TV