esakal | वेषांतर करून फिल्मी स्टाईलने केले आरोपीना जेरबंद

बोलून बातमी शोधा

The accused was arrested in disguise in a filmy style

लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन मुकादमांना चिंचणी-वांगी पोलिसांनी वेषांतर करून फिल्मी स्टाईलने अटक केले.

वेषांतर करून फिल्मी स्टाईलने केले आरोपीना जेरबंद
sakal_logo
By
संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली) : ऊस वाहतूक कंत्राटदारांना ऊस तोडणी मजूर पुरवण्याचा करार करून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन मुकादमांना चिंचणी-वांगी पोलिसांनी वेषांतर करून फिल्मी स्टाईलने अटक केले. प्रकाश गणा राठोड (रा. मोहाडी, जि. जालना) व साजन परशराम राठोड (वय 23, रा. निरखेडा, जि. जालना) अशी त्यांची नावे आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोनसळ (ता. कडेगाव) येथील संपत भाऊ जाधव यांच्याकडून 9 लाख 30 हजार रुपये, तसेच तडसर येथील जयसिंग पवार यांच्याकडून 4 लाख रुपये प्रकाश राठोड याने घेतले, मात्र ऊसतोड मजूर पुरवले नाहीत; तर शिरसगाव येथील विजय दत्तात्रय मांडके यांच्याकडून साजन राठोड याने 6 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी चिंचणी-वांगी पोलिसांत दोन्ही मुकादमांवर गुन्हा दाखल झाला होता. 


आरोपींना अटक करण्याकरता पोलिसांचे पथक जालना येथे आरोपीचा शोध घेत होते. परंतु आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळून जात होते. यावर सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमर जंगम व अशोककुमार परीट हे वेषांतर करून मोहाडी व निरखेडा या तांड्यामध्ये फिरत राहिले. त्याच भागातील लोकांचा वेष परिधान करून आरोपींच्या लपून बसण्याच्या ठिकाणांची माहिती घेतली.

चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे अमर जंगम यांनी विजार, शर्ट आणि टोपी आणि खांद्यावर टॉवेल; तसेच अशोककुमार परीट यांनी धोतर, शर्ट, टोपी आणि खांद्यावर टॉवेल असा वेष परिधान केला होता. दोन्ही आरोपींना सहकारी पोलिस जगदीश मोहिते यांच्यासह तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून जेरबंद केले. आरोपींना कडेगाव न्यायालयात हजर केले असता, बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार गोविंद चन्ने करत आहेत. 

संपादन : युवराज यादव