
माधवनगर (जि. सांगली) : पाणंद रस्त्यांना शेतीच्या रक्तवाहिन्या म्हणतात. शेतीचा आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शेत रस्त्यांवर अवलंबून आहे, पण या रक्तवाहिन्याकडे ना शेतकऱ्यांनी कधी लक्ष दिले, ना गावकऱ्यांनी आणि ना शासन-प्रशासनाने; पण आता मात्र शासनाच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी "बळीराजा पाणंद विकास अभियानाची' घोषणा केली आहे. येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या अभियानाची सुरवात केली जाणार आहे. अचलपूर मतदारसंघात या अभियानाची जोरात तयारी सुरूही झाली असून, अचलपूरचा हा पॅटर्न सांगली जिल्ह्यातही गांभीर्याने राबवण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवायचा असेल तर शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे आणि शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता असला पाहिजे. या अभियानाच्या माध्यमातून पाणंद रस्ते, वृक्षलागवड आणि नाला खोलीकरण हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. अचलपूर मतदारसंघासाठी श्री. कडू यांनी योजनेसाठी शासनाकडून निधी खेचून आणला. सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्यांनीही योजनेसाठी जिल्ह्यात निधी आणून स्वतंत्र पॅटर्न तयार करण्याची संधी आली आहे.
अभियानाबाबत माहिती देताना अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव म्हणाले, ""अचलपूर विधानसभा मतदारसंघातील 600 किमी लांबीचे व एकूण 8 कोटी रुपयांची पांदण रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी "बळीराजा पाणंद विकास अभियानाची' घोषणा केली असून, ग्रामविकासासाठी त्रिसूत्री योजनेची अंमलबजावणीसुद्धा केली जाणार आहे.
पाणंद रस्त्याची कामे ही अधिक दर्जेदार व पारदर्शक होण्यासाठी या कामावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामस्तरीय व मंडळस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये रस्त्याच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक व त्या रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे.'' तालुकास्तरीय समितीमध्ये तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता जलसंधारण विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व इतर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
बक्षीसही मिळणार
अभियानात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला प्रथम : 7 लाख, द्वितीय : 5 लाख आणि तृतीय : 3 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट मंडळस्तरीय समितीला प्रथम : 5 लाख, द्वितीय : 3 लाख व तृतीय : 2 लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुकास्तरीय समितीलाही 15 लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या वेळ व पैशाची बचत होईल
अभियानातून रस्त्यांसाठी नदीतील दगड गोटे वापरून नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत केला जाईल. जलसंधारण, जमिनीचा पोत वाढवणे, दळणवळण सुधारणे, वेळ-अंतर-इंधनाची बचत, रोजगारनिर्मिती, नाल्यातील गाळ काढून पाण्याचा निचरा करणे, पडीक जमिनीवर वृक्षलागवड व फळ लागवड करून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन निर्माण करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आदी कामे होतील. शेतकऱ्यांचे रस्त्यांच्या कारणामुळे होणारे वाद, भांडण मिटवणे, पर्यायाने या कारणासाठी न्यायालयात असणारे दावे संपुष्टात येऊन शेतकऱ्यांच्या वेळ व पैशाची बचत होईल.
- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.