मजबूर नव्हे तर मजबूत सरकारसाठी साथ द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

‘‘महागठबंधनमध्ये ५६ पक्ष आहेत; पण या गठबंधनाला एकाही नेत्याचा चेहरा नाही. साठ वर्षे खोटी आश्‍वासने देऊन ज्यांनी देशाचे वाटोळे केले, त्यांच्या हाती सत्ता देऊन काही उपयोग नाही. मजबूर नव्हे तर मजबूत सरकार हवे असेल असेल ‘एनडीए’ला पर्याय नाही.``

कोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे कार्यक्रम होईल की नाही, याची शंका होती; पण विजांचा कडकडाटातही तरुणांच्या सळसळत्या उत्साहात कार्यक्रम पार पडला. पंचगंगा प्रदूषणापासून सर्कीट बेंचपर्यंतच्या प्रश्‍नांना आदित्य यांनी हात घातला.

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘येत्या २३ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान होत आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. मतदान शस्त्र आहे. पाच वर्षे राजकारणी लोकांचे तुम्हाला ऐकावे लागते; पण निवडणुकीवेळी तुमचे ऐकणे महत्त्वाचे आहे. तुमच्या मनातील गोष्टी मी निश्‍चितपणे दिल्लीला पोचवेन. स्थानिक खासदार सत्ताधारी पक्षाचा नसला की अडचणी निर्माण होतात. केंद्र सरकारच्या विकासाच्या योजना तुमच्यापर्यंत पोचत नाही. येथेही ‘राष्ट्रवादी’चे खासदार असल्याने अडचणी निर्माण झाल्या. येथील विमानसेवेला अन्य शहरांची कनेक्‍टिव्हीटी नाही. नाईट लॅंडिंगची व्यवस्था नाही. कनेक्‍टिव्हीटी असेल तर आयटी, औद्योगिक विकास होऊ शकतो. शेतीपूरक व्यवसाय उभे राहू शकतात. विमानसेवा तसेच रस्ते सहापदरी झाले की कोल्हापूरसह सातारा आणि हातकणंगलेचाही विकास होऊ शकेल.’’

ते म्हणाले, ‘‘महागठबंधनमध्ये ५६ पक्ष आहेत; पण या गठबंधनाला एकाही नेत्याचा चेहरा नाही. साठ वर्षे खोटी आश्‍वासने देऊन ज्यांनी देशाचे वाटोळे केले, त्यांच्या हाती सत्ता देऊन काही उपयोग नाही. मजबूर नव्हे तर मजबूत सरकार हवे असेल असेल ‘एनडीए’ला पर्याय नाही. ३५६ कलम, देशद्रोह कायद्यासंबंधी राहुल गांधी यांचा अजेंडा या बाबी देशाच्या दृष्टीने हितकारक नाहीत. राजकीय प्रदूषण टाळायचे असल्यास काँग्रेस- राष्ट्रवादीला मतदान न करणे योग्य ठरेल.’’

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट करीत श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘दर तीन निवेदनांमागे एक निवेदन प्रदूषणासंबंधी असते. यासंबंधी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याशी बोलणे झाले आहे. प्रदूषणमुक्तीची सुरवात स्वतःपासून करा. गटारीतील सांडपणी नदीत मिसळणार नाही, यासाठी ‘एसटीपी’ची उभारणी आवश्‍यक आहे.’’

कोल्हापूरचे पर्यटन वाढणेही महत्त्वाचे आहे. कोल्हापूरसह पुण्याला सर्कीट बेंच व्हावे, असा ठराव दिल्याने हा प्रश्‍न रखडला. कोल्हापूरच्या वकिलांचा गेली ३४ वर्षे लढा सुरू आहे, असेही सांगण्यात आले.

बेरोजगारीचा प्रश्‍न मिटायचा असेल तर शिक्षण पद्धत बदलायला हवी, असे सांगून ठाकरे यांनी मुंबईतील शाळा डिजिटल होण्यासाठी प्रयत्न केले; तोच प्रयोग ग्रामीण भागातील शाळांसाठी करणार असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, ‘‘शिक्षणमंत्री शिवसेनेचे नसल्याने अडचण निर्माण झाली. शिवसेनेची सत्ता आल्यास हाही प्रश्‍न सुटेल.’’

रोहन घोरपडे, सलोनी शिंत्रे, विकी मगदूम, श्रद्धा सुर्वे, फातिमा मुल्ला, तब्बू करोली यांना प्रश्‍न विचारण्याची संधी मिळाली. ऋषीकेश गुजर, पवन जाधव, हर्षल सुर्वे, मंजित माने, विहान सरनाईक, साईनाथ दुर्गे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

शिट्टी नाही धनुष्यबाणच
कार्यक्रमावेळी उत्साहाच्या भरात एका तरुणाने शिट्टी वाजविली. त्या दिशेला वळत श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘यंदा शिट्टी नाही तर धनुष्यबाण महत्त्वाचा आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray comment