पूरग्रस्त व्यापाऱ्यांना भरपाई देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सांगली - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. आता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जर विमा कंपन्या पूर्ण नुकसान भरपाई देत नसतील, तर मोर्चा काढून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे दिली.

सांगली - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. आता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जर विमा कंपन्या पूर्ण नुकसान भरपाई देत नसतील, तर मोर्चा काढून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे दिली.

श्री. ठाकरे, हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते. हरिपूर (ता. मिरज) येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तेथील नागरिकांशी संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर ते सांगलीतील मुख्य बाजारपेठेतील बालाजी चौकात आले. तेथे व्यापारी
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईसाठी त्रास दिला जात असल्याचे श्री. ठाकरे यांच्या निदर्शनास आणले. तसेच इतरही अडचणी सांगितल्या.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना श्री. ठाकरे यांनी यावेळी दिलासा दिला. ते
म्हणाले, ""शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करत होत्या. त्यामुळे आम्ही मोर्चा काढून न्याय दिला. आता शेतकऱ्यांप्रमाणे पूरग्रस्त व्यापाऱ्यांना विमा कंपनी पूर्ण भरपाई देण्यास टाळाटाळ करत असतील पुन्हा मोर्चा काढावा लागेल. महापुरामुळे सर्वच घटकांचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर - सांगली येथील पूरग्रस्त भागातील नागरिक, व्यापारी तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला भरपाई मिळालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

दौऱ्यामध्ये विविध निवेदने मिळाली आहेत. त्यांनी ज्या विश्‍वासाने आमच्याकडे मागणी केली आहे, त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. सर्वांशी आमची बांधिलकी आहे. त्यामुळे सर्व प्रश्‍न मार्गी लावले जातील.''

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचा संदर्भ घेत ते म्हणाले, ""जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांना पंचनामे करण्याबाबत सूचना केली आहे. त्यांनी उद्यापासून पंचनामे केले जातील असे आश्‍वासन दिले आहे. पूरग्रस्तांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याचे मोजमाप करता येणारच नाही. तसेच कितीही भरपाई दिली तरी कमी पडेल. परंतू पूरग्रस्त व्यापारी वर्गाने पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी आम्ही निश्‍चितच लक्ष देऊ. व्यापाऱ्यांना "जीएसटी' मध्ये सूट मिळावी यासाठी कमिशनरकडे निवेदन द्यावे. शिवसेनेचे नेते आणि आम्ही देखील त्यासाठी प्रयत्न करू.''

व्यापारी संघटनेचे समीर शहा तसेच इतरांनी विविध प्रश्‍न श्री. ठाकरे यांच्यासमोर मांडले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे - पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, माजी नगरसेवक शेखर माने, दिगंबर
जाधव आदी यावेळी उपस्थित होते. व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर श्री. ठाकरे ब्रह्मनाळच्या दिशेने रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray comment visit in Sangli flood affected area