esakal | बाजार समिती संचालकांना प्रशासक की मुदतवाढ ?
sakal

बोलून बातमी शोधा

Administrator or extension of market committee directors?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ 26 फेब्रुवारीला संपली आहे. मुदतवाढ मिळण्यासाठी संचालक मंडळाने पणन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

बाजार समिती संचालकांना प्रशासक की मुदतवाढ ?

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ 26 फेब्रुवारीला संपली आहे. मुदतवाढ मिळण्यासाठी संचालक मंडळाने पणन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळाला मुदतवाढीची प्रतिक्षा लागली आहे. चार दिवसात या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे. 

गतवर्षी बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे 27 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. संचालकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. सहा महिन्यांची मुदतवाढ संपल्यानंतर सभापती दिनकर पाटील यांच्यासह काही संचालकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर मुदतवाढीचे आदेश पणन विभागाने दिले. 26 फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ होती. तत्पूर्वी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सुरवातीला 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती दिली. 31 मार्चपर्यंतची स्थगिती संपल्यानंतर काय होणार? याकडे लक्ष लागले असताना पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली. 

एकीकडे सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या असल्यामुळे बाजार समितीचे मतदार असलेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुकाही पुढे गेल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक घेणे सध्या तरी शक्‍य नाही. 27 फेब्रुवारीला बाजार समिती संचालकांची मुदतवाढ संपण्यापूर्वी संचालक मंडळाने मुदतवाढीची मागणी केली आहे. तर शेतकरी संघटना सहकार आघाडीचे संजय कोले यांनी संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक की संचालक मंडळाला मुदतवाढ याकडे लक्ष लागले आहे. 

बाजार समिती संचालक मंडळाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मुदतवाढीची लॉटरी लागली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे संचालक मंडळाला मुदतवाढीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मुदतवाढीचा प्रस्ताव सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गेला आहे. चार दिवसात त्यावर निर्णय होईल असा विश्‍वास संचालक मंडळाला आहे. त्यामुळे मुदतवाढीची औपचारिकता बाकी असल्याचे चित्र आहे. 

""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. सध्या निवडणूक घेणे शक्‍य नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव आम्ही यापूर्वीच सादर केला आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्‍वास आहे.'' 
- दिनकर पाटील, सभापती, बाजार समिती


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image