आपलं घर भरलेलं असावं पोरी..वेळ काही सांगून येत नाही...

आपलं घर भरलेलं असावं पोरी..वेळ काही सांगून येत नाही...

सातारा ः रस्त्यावर माणसे येईनात, हॉटेल बरोबर दुकानेही बंद होऊ लागली, आठवडे बाजार बंद झाल्याने भाजीची पंचायत होऊ लागली. "कोरोना'च्या धास्तीने सारे काही बंद होऊ लागले. या पार्श्‍वभुमीवर "आपलं घर भरलेलं असावं पोरी.. वेळ काही सांगून येत नाही.." अशी पुर्वी घराघरात आजी, पणजीकडून नव्या सुना - लेकींना दिल्या जाणाऱ्या शिकवणीची सहज आठवण होऊन जाऊ लागली आहे.
 
कोरोनामुळे जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई नसली तरी आता दुकाने, बाजार बंद होऊ लागल्याने घरात आणलेला भाजीपाला, किराणा किती टिकणार, पुरणार असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. 

आपल्याच घरी पुर्वीच्या दुरदृष्टीच्या आजीबाई आपल्या घरातील कणग्या, बरण्या. डबे कधीही खाता येथील अशा पदार्थांनी भरून ठेवत असत. तीच शिकवण घरातील मुलींना आणि नव्याने येणाऱ्या सुनांनाही दिली जायची. ती किती महत्वाची होती हे सध्याच्या "कोरोना'ने आणलेल्या परिस्थितीने स्पष्ट केले आहे. ज्या त्याच्या मोबाईलवर आजी, पणजीचा संदेश एकमेकांना पाठविला जात आहे. 

हेही वाचा  : त्यांचा अहवाल आला; सातारकरांनाे आता सर्व काही तुमच्यावरच अवलंबून

अवश्य वाचा  : अरेच्चा ! महाराष्ट्रातील ही शाळाच सुरु 

"आपलं घर भरलेलं असावं पोरी.." 
"आपलं घर भरलेलं असावं पोरी.." 
"आपलं घर भरलेलं असावं पोरी.. वेळ काही सांगून येत नाही.." आजी म्हणायची.. 

शेंगदाणे, कोरडे खोबरे, तीळ, जवस, कारळ, मिश्र डाळी यापैकी आलटून पालटून एक तरी चटणी घरी असावी.. 
आंब्याचे, लिंबाचे लोणचे, तक्कू, मोरंबा, साखरंबा, गुळंबा सगळ्या बरण्या फडताळात भरलेल्या असाव्या.. 
उडदाचे, बटाट्याचे, पोह्याचे, नागलीचे, तांदळाचे पापड, कुरडया, खारवड्या, चिकवड्या, सांडगे, भरलेल्या मिरच्या.. पत्र्याच्या डब्यात कागद लावून भरून ठेवलेले असावे.. 
"पानाची डावी बाजू अलगद सजते.. आपलं घर कायम भरलेलं असावं पोरी.. वेळ काही सांगून येत नाही.. "आजी म्हणायची.. 

सांडगे, डांगर, मेतकूट, बेसन, कुळीथ पीठ, येसर यांचे डबे भरलेले असावेत.. 
कडवे वाल, मूग, मटकी, वाटाणे, चणे, सोयाबीन, चवळी, कुळीथ, मसूर कडधान्याचे डबे भरलेले असावे.. 
हंगामात हरभऱ्याची, मेथीची एखादी तरी जुडी वाळवून ठेवावी.. 
तूर, मूग, उडीद, हरबरा, मसूर सगळ्या डाळी भरून ठेवाव्या.. वरणाला तर वापरता येतातच पण अडीनडीला पेंडपाला करायला पण कमी येतात.. 
"भाजी मिळाली नाही तरी पंधरवडा सहज काढता येतो पोरी..आपलं घर कायम भरलेलं असावं.. वेळ काही सांगून येत नाही".. आजी म्हणायची.. 

भाजणीचे, आंबोळीचे पीठ करून ठेवावे.. रवा, मिश्र धान्याचा दलिया, शेवया, कुरडयाचा चुरा, पोहे, चुरमुरे, राळे भरलेले असावे.. धिरडी, आंबील, उकडपेंडी, शेंगोळी चटकन बनतात घरी.. 
"नाश्‍त्याचे पन्नास प्रकार घरातल्या सामानात होतात पोरी.. फक्त आपलं घर कायम भरलेलं असावं.. वेळ काही सांगून येत नाही.." आजी म्हणायची.. 

"ओला, सुका दुष्काळ, अन्न टंचाई, पाणी टंचाई, महामारी येते आणि जाते.. 
जाता जाता माणसाला मोठी शिकवण देते.. 
जगरहाटी आहे पोरी भ्यायचं कारण काही नाही.. 
फक्त आपलं घर कायम भरलेलं असावं पोरी.. वेळ काही सांगून येत नाही.." 
आजी म्हणायची..!!! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com