Coronavirus : अरेच्चा ! महाराष्ट्रातील 'ही' शाळाच सुरु

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

हा उपक्रम करताना कोणावरही सक्ती करु नये. विद्यार्थी अभ्यासग्न राहतील यासाठी घरबसल्या जे उपक्रम करता येतील ते देण्याचा प्रयत्न करावा. तसेच या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे सहाय्य घेतले तरी कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
 

सातारा ः ऐन वार्षिक परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थी व शिक्षक पंधरा दिवस संपर्कात राहणार नाहीत. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वर्गशिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या संपर्काकरिता ऑनलाईन स्कूलींगसह व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार करून त्याद्वारे माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवून गेल्या तीन दिवसांपासून सातारा शहरातील शिवसह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलने उपक्रम राबविला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील शाळांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रमासाठी उपाययोजना राबविण्याचा आदेश काढला आहे.
 
कोरोनो विषाणूंचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून शासनाने शाळा आणि महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी दिली आली आहे. हाच काळ अनेक प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील नववी वर्गापर्यंतच्या परीक्षेचा काळ आहे. सध्या अभ्यासक्रम शेवटच्या टप्प्यात आहेत. शाळांना जरी सुटी देण्यात आली असली तरी सोमवारी (ता.16) रात्री साताराचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आदेशानानूसार मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेतच उपस्थित राहात आहेत. सुटीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील निर्माण होणार दूरावा कमी करण्यासाठी आणि मुलांना अभ्यासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी येथील शिवसह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलने ऑनलाईन स्कूलींगचा उपक्रम राबविला. त्याबाबतची माहिती मुख्याध्यापिक निलीमा मोहिते यांनी दिली. आमच्या संस्थेच्या दोन शाखा आहेत. एक सातारा शहरात आणि दूसरी ग्रामीण भागातील गजवडी येथे. या दोन्ही शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत. दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांशी आमच्या शिक्षकांचा संपर्क राहिला पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची उजळणी करता यावा यासाठी शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतरी वांगडे यांनी वर्क फ्राॅम हाेमच्या धर्तीवर मुलांसाठी लर्न फ्रॉम होम ही संकल्पना आमच्यापूढे मांडली. त्यात परीक्षेपूर्वी तब्बल 15 दिवस विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कोणताही संपर्क राहणार नाही. आता थेट एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठीच विद्यार्थी शाळेत येतील. त्यामुळे परीक्षेसंबंधित माहिती व उर्वरित अभ्यासक्रमाबाबत अथवा जे अभ्यासक्रम पुर्ण झाले आहेत त्याची विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना माहिती देता यावी वर्गशिक्षकांच्या माध्यमातून व्हॉटस्‌प ग्रुप तयार करण्याचे ठरले. आता या ग्रुपच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला जात आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील येणाऱ्या अडचणी सोडविल्या जात आहेत. या 15 दिवसांत दिला जाणारा हाेमवर्क त्यांनी स्वतंत्र वहीत करावा अशा आम्ही सूचना केल्या आहेत. शैक्षणिक लिंक देखील पाठवित आहाेत. काही शैक्षणिक व्हिडिओ देखील तयार करुन प्रसारित करण्याचा आमचा हेतू आहे.
दरम्यान ऑनलाईन स्कूलींगमध्ये दूसरा टप्पा हा सर्व विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन शिक्षणात लॅपटॉप किंवा मोबाईलद्वारे सहभाग घेता येणे शक्‍य आहे. सर्व विद्यार्थी एकाच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येतील व ते सर्वांना सोईस्कर असेल अशी विविध अप्लिकेशन आहे. गुगल हॅंग आऊट, झूम-मीटिंग अप्लिकेशनची चाचणीही घेण्यात आली. आगामी काळात विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड काढायला लावून सर्वांना या ऍप्लिकेशनला कसे कनेक्‍ट व्हायचे याची माहिती देणार आहोत. 

शाब्बास रे पठ्ठया ! चालत्या ट्रेनमधून उडी मारुन चाेरट्यास पकडले

झूम-मीटिंग असे चालते..! 
या ऍप्लिकेशनद्वारे मीटिंगचा आयडी-पासवर्ड काढल्यावर ग्रुपमध्ये सहभागी होता येते. एक शिक्षक शिकविताना सर्वांना दिसू शकतात तर एकाच वेळी चार जणांना स्क्रीनवर यातील कुणालाही घेता येते. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांना थेट पोचता येते आणि वर्गासारखे संवाद इथे करता येताे.

शिक्षण विभाग म्हणते आता व्हॉटसऍप स्कूलींग

दरम्यान सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा अभ्यास बूडू नये यासाठी शाळा आणि शिक्षकांनी व्हॉटसऍपच्या माध्यमातून संपर्कात राहावे तसेच अभ्यास, खेळ आदींबाबत सूचना द्यावेत असा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी आज (गुरुवार) एक परिपत्रकाद्वारे काढला आहे.
 
पालकांसाठी वर्गनिहाय व्हॉटसऍप ग्रुप करावेत. व्हॉटसऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुट्टीच्या काळातील अभ्यासाचे वेळापत्रक पालकांना द्यावे. दरारोज कोणत्या विषयाचा व कोणकोणत्या घटकाचा अभ्यास- सराव करावयाचा आहे याची ग्रुपच्या माध्यमातून कल्पना द्यावी. आठवड्यातून एकदा छोट्या स्वरुपातील सराव चाचणी विषयनिहाय द्यावी. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्र रंगवा या उपक्रमांतर्गत वयोगटानूसार कला विषय असलेल्या शिक्षकांनी दररोज एक चित्र उपलब्ध करुन द्यावे. विद्यार्थ्यांना घरी बसून करता येतील असे वर्गनिहाय कार्यानुभवाचे उपक्रम द्यावेत. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पीडीएफ स्वरुपात शक्‍य असल्यास पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत (वयोगटानूसार). अवांतर वाचनाच्या पुस्तकांची यादी देण्यात यावी. वैयक्तिक स्वच्छता या विषयी ग्रुपवर माहिती द्यावी.

सातारा : खासदार उदयनराजेंनी केला मानाचा मुजरा

नाविन्यपुर्ण अभ्यासक्रम उपक्रम एकमेकांना शेअर करावेत. घरबसल्या कोणते उपक्रम राबवता येतील याची माहिती द्यावी. टी.व्ही व मोबाईलपासून विद्यार्थ्यांनी दूर राहणेसाठी मनोरंजनात्मक बैठे खेळ सूचवावेत. (दररोज एक खेळ देणेत यावा). आई, वडिलांना कामात मदत करणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे स्वतःची कामे स्वतः करणे यासाठी प्रोत्साहित करणे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी ओंकार, योगासने, प्राणायम, आनापान, ध्यान याबाबत माहिती देण्यात यावी. घरबसल्या खेळ खेळू शकतील याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी तसेच अनावश्‍यक पोस्ट ग्रुपवर टाकू नयेत असे ही निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. दरम्यान दिक्षा ऍप आणि एएलओज स्मार्ट क्‍यू ऍप विद्यार्थ्यांनी वापरावे यासाठी प्रोत्साहान द्यावे.
 
हा उपक्रम करताना कोणावरही सक्ती करु नये. विद्यार्थी अभ्यासग्न राहतील यासाठी घरबसल्या जे उपक्रम करता येतील ते देण्याचा प्रयत्न करावा. तसेच या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे सहाय्य घेतले तरी कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Coronavirus : सातारा जिल्ह्यातील प्रत्येकासाठी महत्वपुर्ण बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Schooling By Shivsahyadri English Medium School Satara