esakal | आषाढीनंतर कार्तिकीचीही वाट खडतरच... संचारबंदीच्या शक्‍यतेने दर्शनाबाबत संभ्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

After Ashadi, Karthiki wari way is also tough ... Confusion about Darshan due to the possibility of curfew

त्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू असल्याने वारकऱ्यांच्या वाटेत अडथळे येत आहेत. महामार्गाच्या कामांमुळे वाहनांची वर्दळ, प्रचंड धूळ याचा सामना करतच वाट काढावी लागत आहे.

आषाढीनंतर कार्तिकीचीही वाट खडतरच... संचारबंदीच्या शक्‍यतेने दर्शनाबाबत संभ्रम 

sakal_logo
By
अजित कुलकर्णी

सांगली : कोरोनामुळे यंदा आषाढी वारीवर आलेले संकटाचे ढग कार्तिकी वारीवरही कायम आहेत. पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या दिंड्यांची संख्याही अल्प आहे. त्यात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू असल्याने वारकऱ्यांच्या वाटेत अडथळे येत आहेत. महामार्गाच्या कामांमुळे वाहनांची वर्दळ, प्रचंड धूळ याचा सामना करतच वाट काढावी लागत आहे. दिंड्या मोजक्‍या असल्या तरी त्यांचा ठिकठिकाणी होणारा मुक्‍काम वाटेतील अडथळ्यांमुळे वाढत आहे. 

यंदा कोरोनामुळे कधीही खंड न पडणारी आषाढी वारी थांबली. पंढरपुरात तर कडकडीत संचारबंदी असल्याने वारकऱ्यांशिवाय आषाढी एकादशी इतिहासात प्रथमच झाली. आषाढी वारीला किमान 6 ते 7 लाख लोक पंढरीत दाखल होतात. खासगी वाहने, एसटी बसेस, रेल्वेने येणाऱ्या भाविकांपेक्षा खेड्यापाड्यातून पायी चालत येणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांसह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश राज्यातील वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. तोच माहोल कार्तिकी वारीलाही असतो. सांगलीतून सुमारे डझनभर दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी पायी वारी करतात. नामदेव मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, त्याचप्रमाणे इतर भागातून श्रद्धेने दिंड्या काढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सर्व देवालये बंद असल्याने एकमेकांशी होणारा संपर्क थांबला आहे. त्यामुळे पायी वारीचे नियोजन यंदा नसेल. 

कार्तिकी वारीला प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर येथील भाविकांच्या पायी दिंड्या या मार्गावरून शेकडो वर्षांपासून जातात. कोरोनामुळे एकही दिंडी वा वारकरी या मार्गावरून न गेल्याचे इतिहासात प्रथमच घडले. महामार्गाच्या कामात येणारे महाकाय वृक्ष तोडले गेले. त्यामुळे यंदा पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना यातना सहन कराव्या लागत आहेत. सावलीसाठी ना झाड... ना निवारा... अशा स्थितीतही मार्गक्रमण सुरू आहे. किमान कार्तिकी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस भाविकांना लागली आहे. त्यासाठी पायी वारीतून जाण्याची अनेकांनी तयारीही केली आहे. दिवाळीनंतर कार्तिकी वारीचे वेध लागले असताना, पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उद्‌भवत असल्याने भय संपायला तयार नाही. संसर्गाच्या भयाने कार्तिकी वारीही रद्द होण्याची शक्‍यता आहे.

वारीदरम्यान (ता.25) व 26 रोजी पंढरपुरातच संचारबंदी पुकारली जाण्याची शक्‍यता असल्याने वाहनाने जाणारेही साशंक आहेत. आज रविवार (ता.22) पासून पंढरपुरात येणाऱ्या एस.टी. गाड्याही पूर्णत: बंद केल्या आहेत. पंढरपूर आगारातून एकही बस बाहेर जाणार नाही व बाहेरील बस आगारात येणार नाहीत, याची खबरदारी प्रशासन घेत आहे. 

मंदिर खुले...मग संचारबंदी कशासाठी? 
कोरोनामुळे आषाढी वारीची एकही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता निष्ठेने पायी वारी करणारे वारकरी त्यामुळे नाराज झाले होते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांना लागलेले टाळे अखेर निघाले. आता विठुरायाचे डोळे भरुन दर्शन घेता येणार, ही आशा लागली होती. मात्र पंढरीत एकादशीला पुन्हा संचारबंदीची प्रशासनाने तयारी केल्याने वारकऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे. आठ महिन्यांपासून बंद असलेले मंदिर खुले झाले खरे; पण संचारबंदी लागू केल्याने दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांना दर्शनाबाबत संभ्रम आहे. 

वारीविना एकादशी मनाला वेदनादायी
गेल्या 40 वर्षांपासून आषाढी वारी करतो. कोरोनामुळे यंदा ती घडली नाही, म्हणून कार्तिकी एकादशीला जाण्याचा बेत केला. गावातून 4 दिंड्या पायी वारी करतात. मात्र महामारीचे संकट अजून संपले नसल्याने दर्शनाला मुकण्याची वेळ आलीय. विठ्ठल भेटीतून मिळणाऱ्या आनंदापासून यंदा प्रथमच दुरावल्याची खंत आहे. पायी वारीविना एकादशी साजरी करणे मनाला वेदनादायी आहे. 
- जालिंदर चोपडे, सांगलीवाडी 

संपादन : युवराज यादव

loading image