स्वाभिमानीत घरवापसीनंतर रविकांत तुपकर म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

संघटना सोडल्यानंतरही लोकांनी माझ्यावर टीका टिपणी केली नाही. हे चळवळीचे संस्कार आहेत. राजू शेट्टी यांनी मला परत येण्याचे आवाहन केले. सगळे अंतर्गत वाद संपवले. मी पदाचा लोभी नाही, पद मिळाले नाही म्हणून नाराज झालो नाही. पदात मला रस नाही.आता पद मिळो अथवा न मिळो मी शेट्टी यांच्या बरोबर वाड्या वस्त्यांवर काम करणार.

- रविकांत तुपकर

कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत गेलेले रविकांत तुपकर यांनी आज पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीत पुन्हा प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. 

स्वाभिमानीत घरवापसीनंतर तुपकर म्हणाले, अलीकडे अंतर्गत वाद वाढले होते. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांना सांगूनही त्यात सुधारणा होत नव्हती. यामुळे मी रयत संघटनेत जाण्याचा निर्णय घेतला. पण मला गेले अठरा दिवस माझी झोपच उडाली आहे. चळवळ सोडल्याचे दुःख होते. राज्यभरातून शेतकरी घरी आले. त्यांनी चळवळ न सोडण्याचा निर्णय घेतला. शेट्टी यांच्या मुशीत वाढल्याने आरोप केले नाहीत. उलट संघटना सोडल्यानंतर ही मी शेट्टी यांच्या संपर्कात होतो.
संघटनेतले कार्यकर्ते रडत होते. त्यांनी मला शेट्टी यांच्या बरोबर तुम्ही हवे आहात, असे सांगितले. लोक आपल्यावर किती प्रेम करतात हे आपल्याला राजीनाना दिल्यावर कळले.

संघटना सोडल्यानंतरही लोकांनी माझ्यावर टीका टिपणी केली नाही. हे चळवळीचे संस्कार आहेत. राजू शेट्टी यांनी मला परत येण्याचे आवाहन केले. सगळे अंतर्गत वाद संपवले. मी पदाचा लोभी नाही, पद मिळाले नाही म्हणून नाराज झालो नाही. पदात मला रस नाही.आता पद मिळो अथवा न मिळो मी शेट्टी यांच्या बरोबर वाड्या वस्त्यांवर काम करणार.

- रविकांत तुपकर

घरवापसीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,  स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला होता. संघटनेचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्याचा मला धक्का बसला होता. संघटनेत ताण तणाव होता. यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना सल्ला दिला. आम्ही ही एकत्रित बसलो. संघटना म्हणजे कुटुंब आहे. सगळे वाघ आहोत. पण आता एकमेकांना पंजे मारण्याऐवजी एकत्रित येणे गरजेचे होते. यामुळे तुपकर यांनी परत स्वाभिमानीत प्रवेश केला आहे. त्यांचे मी स्वागत करतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After return to Swabhimani Ravikant Tupkar said