भाजपचे टाळ, मृदंग वाजवत आंदोलन; मंदिरे त्वरित उघडण्याची मागणी

बलराज पवार
Wednesday, 14 October 2020

महाविकास आघाडी सरकारने "मदिरालय' उघडण्यास परवानगी दिली. मग "देवालय' उघडण्यास परवानगी का देत नाही असा सवाल करत आज भाजपच्या वतीने गणपती मंदिरासमोर टाळ, मृदंग वाजवत आरती करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

सांगली : महाविकास आघाडी सरकारने "मदिरालय' उघडण्यास परवानगी दिली. मग "देवालय' उघडण्यास परवानगी का देत नाही असा सवाल करत आज भाजपच्या वतीने गणपती मंदिरासमोर टाळ, मृदंग वाजवत आरती करुन अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे आणि अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक अजयकुमार वाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सुमारे तीन महिने लॉकडाऊन केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करताना सरकारने दुकाने, हॉटेल्स, बसेस, रेल्वे या सार्वजनिक सुविधा सुरु केल्या आहेत.

महसूल मिळतो म्हणून मादिरालये उघडण्यास परवानगी दिली. पण, मंदिरे, क्रीडांगणे, व्यायामशाळा उघडण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. याला "उद्धवा अजब तुझे सरकार' असंच म्हणण्याची वेळ आली आहे असे मत शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ऍड. स्वाती शिंदे यांनी, राज्य सरकारने केंद्राच्या सूचनांचे पालन करून मंदिरे उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी. यामध्ये भक्तांच्या भावना गुंतल्या आहेत. सरकारने परवानगी न दिल्यास भक्त स्वतःहून मंदिरात घुसतील असा इशारा दिला. 

यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य निशिकांत शेटे, नगरसेविका भारती दिगडे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, गंगा तिडके, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, लता शहा, रुपाली देसाई, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aggitation by BJP's against govt, Demand for immediate opening of temples