केंद्रातील सरकार पाडण्यासाठी आंदोलने : विनोद तावडे

बलराज पवार
Thursday, 18 February 2021

केंद्रातील सरकार भक्कम आहे. ते पाडण्यासाठी विरोधक जाणीवपुर्वक आंदोलने करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी आज केली. 

सांगली : केंद्रातील सरकार भक्कम आहे. ते पाडण्यासाठी विरोधक जाणीवपुर्वक आंदोलने करत आहेत. एल्गार परिषदेपासून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर सीएए विरोधात दिल्लीत शाहीनबाग येथे आंदोलन केले. शेतकरी आंदोलन सुरु आहे. कायदा हातात घेऊन कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजून नुकसान करणाऱ्या आंदोलनजीवींची संख्या वाढते आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी आज केली. 

सांगली अर्बन बॅंकेच्या सभागृहात विद्यार्थी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आज हरियाणच्या प्रभारीपदी तसेच राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल विनोद तावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास भाजपाचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव सांळुखे व नितीन शिंदे, संजय परमणे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या माजी कार्यकर्त्याच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

तावडे म्हणाले, भाजपाचा प्रवास दोन खासदारांपासून सत्तेपर्यंत गेला. पक्षही वाढला. या माध्यमातून समाजहिताच्या गोष्टी घडल्या. केंद्रातील मोदी सरकार भक्कम आहे. पण, विरोधकांनी विविध आंदोलने करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा आंदोलनजीवी असा उल्लेख केल्याने विरोधक खवळले. मात्र कायद्यापेक्षा स्वत:ला मोठे समजणारे आंदोलक हे आंदोलकजीवी आहेत. आम्हीही चळवळी केल्या आहेत. मात्र त्या कायद्याच्या चौकटीत राहून. त्यामुळे आंदोलन पेटवणाऱ्यांनी आम्हाला चळवळ शिकवू नये. 

पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रेय मिळू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी दिलेला निधी तृणमूल सरकारच्या तिजोरीत पडून आहे. ममता बॅनर्जींच्या भ्रष्ट सरकारला तेथील जनता कंटाळली आहे. त्यामुळे लोकसभेला 121 विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली. त्यामुळे वैतागलेली जनता तृणमूल कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीत सत्तेतून दूर करेल. 

यावेळी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे डॉ. राम लाडे यांचा कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय परमणे यांनी केले. विशाल गायकवाड यांनी आभार मानले.

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitations to overthrow the central government: Vinod Tawde