देशातील पहिल्या किसान रेल्वेला कृषिमंत्र्यांचा हिरवा ध्वज...

विनायक जाधव
Friday, 7 August 2020

शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी किसान रेल्वे  ठरणार सहकारी... 

बेळगाव : किसान रेल्वे शेतीपुरक व्यवसायाला उत्तेजन देण्यासह शेतकऱ्यांना पिकाला योग्य भाव मिळवून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी किसान रेल्वे सहकारी ठरणार आहे,  असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. 

देशातील पहिल्या किसान रेल्वेला हिरवा ध्वज दाखवून त्यांनी चालना दिली. महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूर दरम्यान ही पहिली रेल्वे धावली. दिल्ली येथून आभासी व्यासपीठावरुन याचा शुभारंभ करण्यात आला. ते म्हणाले, "पुरेशी वाहतुकीची सुविधा असल्यास किंमतीत होणारी घसरण रोखणे शक्‍य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात रेल्वे विभागाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे." शेतकऱ्यांच्या हितासाठी रेल्वेने सुरू केलेल्या सेवेचे देखिल त्यांनी यावेळी कौतुक केले. 

हेही वाचा- कसबा बावडा-शिये मार्गावर पाणी ; वाहतूक बंद 

दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, देशातील हा पहिला पायलट प्रकल्प आहे. पंतप्रधानांनी रेल्वेने देशाच्या प्रगतीचे इंजिन व्हावे, असे म्हटले होते. त्यानुसार त्यांचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे. यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील कृषी उत्पादनांची सुरळीत आणि सुलभ वाहतूक होईल. यामुळे देशातील शेतकरी समुदायास स्वावलंबी होण्यास आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. 

हेही वाचा- प्रवाशांसाठी सुचना : २० ऑगस्ट पर्यंत या पर्यायी मार्गावरुन धावणार कोकण रेल्वे,  असे आहे वेऴापत्रक वाचा -

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आभासी व्यासपीठावरून बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी म्हणाले, कर्नाटकाने देखिल किसान रेल्वेसाठीचा प्रस्ताव पाठविल्यास कर्नाटकात ही रेल्वे सेवा सुरू केली जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर ठरेल. त्यासाठी आपण केंद्र पातळीवर प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, छगण भुजबळ, खासदार भारती पवार, हेमंत गोडसे, रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आदी उपस्थित होते. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister Narendra Singh Tomar speech for farmer kisian railway