शेतीतील कामांसाठी आता सेवा पुरवठादार

विशाल पाटील
मंगळवार, 19 जून 2018

सातारा - कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांत्रिकीकरण, शेतमजुरी, रोगराई, औधषे या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक कामे माफक दरात करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सेवा पुरवठादार नेमून त्यांना अर्थसाहाय्य देण्याची योजना जिल्हा परिषद राबविणार आहे. 

सातारा - कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांत्रिकीकरण, शेतमजुरी, रोगराई, औधषे या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक कामे माफक दरात करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सेवा पुरवठादार नेमून त्यांना अर्थसाहाय्य देण्याची योजना जिल्हा परिषद राबविणार आहे. 

शेतीतील भांडवल व मिळणाऱ्या उत्पादनाचा ताळमेळ घातल्यास दिवसेंदिवस शेती किफायतशीर होत नाही, असे दिसून येत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना कृषी औजारे, ट्रॅक्‍टर, इतर प्रक्रिया यंत्रांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वेळप्रसंगी मजुरीचा दरही जादा द्यावा लागतो. मजूर व सेवा सुविधांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी, कमी भाडेदरात साधने मिळण्यासाठी कृषी सभापती मनोज पवार यांच्या संकल्पनेतून सेवा पुरवठादार नेमण्याची योजना जिल्हा परिषद राबवित आहे. त्यास सभागृहानेही मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात सेवा पुरवठादार नेमले जाणार असून, त्यात दहा प्रगतशील शेतकऱ्यांचा गट तयार केला जाणार आहे. त्यांच्यासाठी सेस फंडातून अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

२५ टक्‍के कमी दराने भाडे
या योजनेत सेवा पुरवठादारांवर जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या असून, त्याने वर्षभरात किमान १०० हेक्‍टर क्षेत्रावर कृषीविषयक सेवा देणे, तसेच प्रचलित भाडेदरापेक्षा किमान २५ टक्‍के कमी दराने भाडे आकारून सेवा देणे बंधनकारक आहे. औषधांची फवारणीची कामे प्रशिक्षित व पेस्ट कंट्रोल परवानाधारक व्यक्‍तीच्या मार्गदर्शनाखाली करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न होणारा धोका टाळता येईल. या गटास कृषी औजारांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तीन लाखापर्यंत अनुदान दिले जाईल. 

शेतकऱ्यांना पुरविलेल्या सेवा- सुविधांची माहिती रेकॉर्ड केली जाणार असून, त्याची तपासणीही केली जाईल. शेतकऱ्यांना योग्य प्रकारे सेवा पुरविली जात आहे की नाही, याची पंचायत समिती व विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.

योजनेमागील हे आहेत उद्देश...
 शेतकऱ्यांना प्रचलित भाडेदरापेक्षा कमी दराने शेतीविषयक सेवा उपलब्ध
 पेरणीपासून काढणी पश्‍चात प्राथमिक प्रक्रियेपर्यंत यांत्रिकीकरणाची भाडेतत्त्वावर सेवा
 बेरोजगार कृषी पदवीधारकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे
 सेवा पुरवठादारास विविध औजारांचे भांडवली खर्चासाठी अर्थसाहाय्य करणे
 शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करणे
 पीक संरक्षण, फवारणीसारख्या कामातून शेतकऱ्यांची जोखीम कमी करणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture work service