कोरोनावर आलं औषध... नगरच्या या भाजप नेत्याने शोधला उपाय, बघा व्हिडिओ

संजय आ. काटे
Wednesday, 11 March 2020

श्रीगोंद्यातील भाजप नेते व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हा शोध लावला आहे. या बाबत त्यांनी स्वतःची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. 

श्रीगोंदे ः कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. धडाधड कंपन्या बंद पडत आहेत. शेअर बाजारही गडगडत आहेत. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या कोरोनाला अद्यापि आळा घालता आलेला नाही. मात्र,भाजप नेत्यांनी त्यावर जालिम उपाय शोधले आहेत. कोणी म्हणतो गोमूत्र प्या, कोणी सांगतं शेण खाल्ल्यासही कोरोना पळून जाऊ शकतो. यात भर पडली आहे. नगरच्या एका भाजप नेत्यांची. त्यांनीही एक जालिम उपाय सूचवला आहे.

त्यांनी सूचवलेल्या एकदम घरगुती उपायामुळे ते चांगलेच ट्रोल होत आहेत.  श्रीगोंद्यातील भाजप नेते व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हा शोध लावला आहे. या बाबत त्यांनी स्वतःची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. 

हेही वाचा - बघा उद्या काय होतंय महाराष्ट्रात, विखे पाटलांच्या दाव्याने खळबळ

नागवडे यांनी या क्लिपच्या आधारे जगभरातील डॉक्टर व तज्ञांना आवाहन केले आहे. जुन्या काळात महिला व  पुरुषही तपकीर ओढत होते. या तपकिरीचा उग्र वास कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यास कामी येऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. या क्लिपच्या आधारे त्यांनी एक प्रकारे कोरोनाला नष्ट करण्यासाठी तपकिरीचा पर्याय ठेवला आहे.

नागवडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लीप त्यांचीच आहे. तपकीरीचा उग्र वास  कोरोनो विषाणू गायब करण्यास मदत करू शकतो, या त्यांच्या दाव्यावर ते ठाम आहेत. याबद्दल आता तज्ञ त्यांच्या मताशी सहमत होतात की नाही हे पाहणे उचित ठरेल.

कोण आहेत नागवडे
राजेंद्र नागवडे हे दिवंगत ज्येष्ठ नेते व राज्य  साखर संघाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव आहेत. राजेंद्र हेही सध्या साखर संघाचे संचालक आहेत. विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे व नागवडे घराण्याचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे कट्टर विरोधक  असणारे राजेंद्र नागवडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पाचपुते यांचे निवडणूक प्रचार केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar BJP leader finds Corona solution