नगरमध्ये किराणा मालाचा काळाबाजार... शेंगादाणे १५०, साखर ५० रूपये किलो

In Ahmednagar, peanuts sell for Rs 5 per kg
In Ahmednagar, peanuts sell for Rs 5 per kg

नगर ः कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दानशूर अनेक व्यक्ती मदतीचा हात देत आहेत. दुसरीकडे मात्र, काही लोभी किराणा दुकानदार या संकटातही आपली पोळी भाजून घेण्यासाठी चढ्या भावाने मालाची विक्री करून काळाबाजार करीत आहेत. मात्र, सध्या माल संपल्याने किराण दुकानदार मोठ्या व्यापाऱ्यांकडून माल आणतात. मात्र, त्यांच्याकडून चढ्या भावाने त्यांना खरेदी करावी लागते आहे. परिणामी ते दुकानदारही आणखी चार पैसे वाढवून घेत विक्री करीत आहेत. काही लोक चिमूटपणे हा माल घेत आहेत तर काही त्या दुकानदारासोबत वादावादी करीत आहेत. शहरासह जिल्ह्यातही हे चित्र दिसते आहे.

ही बाब निदर्शनास येताच, दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा भावाने किराणा माल विकणे बंद करावे, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांनो, याद राखा, या कायद्यानुसार सात वर्षांची शिक्षाही होऊ शकते. 

किराणा दुकानदारांकडून लूट होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने माल विकण्याचा धडाका लावला आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलीत दुकानदारांना सक्त ताकीद दिली आहे.

तहसील कार्यालय येथे नागरिकांच्या शंका-समाधानासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सावेडी येथील अजय गायकवाड यांनी फोन करून, रेशन कार्ड नसून पत्नी, मुले उपाशी असल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदार उमेश पाटील यांच्या निर्देशानुसार संबंधित कुटुंबाला अन्नधान्य घरपोच देण्यात आले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अशी अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. तहसील कार्यालयाच्या समन्वयाने 900 व्यक्तींना जेवणाची पाकिटे पुरविण्यात आली. तहसील कार्यालय येथे सुरू करण्यात आलेला नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. लोकांनी अडी-अडचणीसाठी संपर्क साधावा, जेणे करून अडचणीचे प्रशासनाला निवारण करता येईल. 

जीवनावश्‍यक वस्तू चढ्या भावाने विकू नयेत, यासाठी सर्व किराणा दुकानदारांना निर्देश देण्यात आले आहेत. जो कोणी दुकानदार किराणा मालाची विक्री चढ्या भावाने करीत असेल, त्याच्यावर जीवनावश्‍यक वस्तू कायदा, 1955 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यात सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. किराणा मालाच्या विक्रीबाबतही काही तक्रार असेल, तर नागरिकांनी नियंत्रण कक्षात संपर्क करावा. 

- उमेश पाटील, तहसीलदार

किराणा मालाचे दर (अनुक्रमे पूर्वीचे आणि आताचे) - शेंगादाणे -९०-१५०, पोहा - ३७-५५, तेल - ८५-११५, तूर डाळ - ७९-९०, मूग डाळ - ९७-११५, हरभरा डाळ - ५०-६५. 

प्रशासनाने शहानिशा करावी

सध्या दुकानातील माल संपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेला लॉकडाऊन किती काळ चालेल हे माहिती नाही. त्यामुळे लोकांकडून महिना-दोन महिन्यांचा किराणा माल भरला जात आहे. त्यामुळे माल लवकर संपतो. मात्र, आम्हाला मोठ्या व्यापाऱ्यांकडून माल घ्यावा लागतो. ते एक तर माल नाही असे उत्तर देतात. जो माल देतात, त्यालाही चढा दर लावतात. किरकोळ दुकानदार मग त्याचे दरही तसेच लावतात. त्यामुळे चढ्या दरामुळे वादावादी होते. लोकांना समजून सांगणेही आता कठीण झाले आहे. प्रशासानाने नेमके कोण भाववाढ करते आहे आणि कोण काळाबाजार करते, याची शहानिशा केली पाहिजे.

- महादेव गवळी, किराणा दुकानदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com