esakal | `देशात तीन मोदी आले आणि होत्याचे नव्हते झाले'

बोलून बातमी शोधा

null
`देशात तीन मोदी आले आणि होत्याचे नव्हते झाले'
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कागल - देशात तीन मोदी आले आणि होत्याचे नव्हते झाले. क्रिकेटमधील पैसा ललीत मोदीने नेला. पंजाब नॅशनल बॅंक लुबाडून नीरव मोदी परदेशात गेला.’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

येथील बापूसाहेब महाराज चौकात झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत ते बोलत होते. वसंतराव धुरे अध्यक्षस्थानी होते. 

‘शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासी, महिला, युवक, कामगार आदींच्या विरोधी असलेले जातीयवादी भाजप सरकार उलथवून टाका, परिवर्तनाची ताकद जनतेच्या मतातच आहे. नोटाबंदी काळात आरबीआयत जमा झालेल्या १५ लाख कोटी रुपयांत भ्रष्टाचार दडला आहे. यातील नकली, काळा व पांढरा पैसा याबाबत काहीही सांगितले जात नाही. निवडणुका आल्या की भाजप-सेनेला राम आठवतो,

-  अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

श्री पवार म्हणाले, ‘‘थापा मारण्यात मोदी आणि फडणवीस सरकारचा हात कोणीही धरत नाही. महिलांवरील अत्याचार वाढून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सीबीआयपासून न्यायालयापर्यंत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे एफआरपी मिळत नाही. भाव ३४०० करा, ताबडतोब कारखानदारांना एफआरपी द्यायला सांगतो. जर राज्यकर्त्यांत धमक आणि ताकद असेल तर नडलेल्या माणसाला ताबडतोब मदत करता येते; पण यांना करायचेच नाही.’’ 

जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या ऑडिओ क्‍लिप लोकांना ऐकविल्या. ते म्हणाले, ‘हे सरकार लोकहिताचे नाही हा अनुभव सर्वत्र असल्याने आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. भाजप - सेनेचे उमेदवार जिथे निवडून आले तिथे परिवर्तन करायचे आहे.’

 ‘सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अनेक घटक पक्ष युतीतून बाहेर पडत आहेत. येत्या निवडणुकीत या सरकारला हद्दपार करण्याची गरज आहे.’

- धनंजय महाडिक, खासदार

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘युतीच्या सत्तेत सर्वजण हैराण आहेत. सामान्यांना जगणे मुश्‍कील झाले आहे. वाराणसी, पंढरपुरात यांनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे. उध्दव ठाकरे हेच सरकारमध्ये राहून सरकारचे वाभाडे काढत आहेत.’

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, प्रवीणसिंह पाटील, राजश्री माने, संगीता खाडे, संग्राम कोते-पाटील, युवराज पाटील, भैया माने, नवीद मुश्रीफ, अनिल साळोखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  शिवानंद माळी यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा माणिक माळी यांनी आभार मानले. 

४४ जागांचा निर्णय 
श्री. पवार म्हणाले, ‘आम्ही, सेक्‍युलर पक्ष एकत्र येऊन आघाडी करीत आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभेबाबत ४४ जागांचा निर्णय झाला आहे. 

प्रियंका आल्याने भाजपच्या पोटात दुखते
श्री. पवार म्हणाले, ‘सरकारची मुदत २०१९ ला संपताना २०२२ ला सर्वांना घरे देण्याची घोषणा करतात यातच त्यांच्या भूलथापा दडल्या आहेत. प्रियंका गांधी राजकारणात आल्याने भाजपच्या पोटात दुखत आहे. भाजप सरकारने बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा आहे त्या ट्रेन दुरुस्त कराव्यात.’