
सांगली : आलमट्टी धरणाच्या ‘बॅक वॉटर’मुळेच सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत महापूर येतो. हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. आता कर्नाटक सरकार या धरणाची उंची आणखीन पाच मीटरने वाढवत आहे. यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील कृष्णाकाठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. आपले मरण टाळण्यासाठी आता राज्य सरकारवर फारसे अवलंबून न राहता तिन्ही जिल्ह्यांतील पूरग्रस्त नागरिकांनीच न्यायालयासह रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी पुढे यावे. कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून या प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत नसल्याने याविरोधात तिन्ही जिल्ह्यांत एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय सांगलीत झालेल्या खासदार-आमदारांच्या बैठकीत झाला.