बेळगावात हुल्लडबाजांना का दिला चोप ?

अमृत वेताळ
Monday, 10 August 2020

संबंधित व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने सगळीकडे हा चर्चेचा विषय बनला आहे. 

बेळगाव : राजहंसगड परिसरात बसून मद्यप्राशन आणि धुम्रपान करणाऱ्या मद्यपी टोळक्‍याला बेळगावातील एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून चोप दिला. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर मद्यपींकडून गडकोट किल्ला परिसरात पडलेल्या मद्याच्या बाटल्या गोळा करुन परिसर स्वच्छ करुन घेण्यात आला. मद्यपी टोळक्‍याला काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून सध्या बेळगावत  हा चर्चेचा विषय बनला आहे. 

हेही वाचा - बेळगावकरांना या कारणासाठी करावी लागते हुबळीवारी..

राजहंसगड किल्ला परिसराला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. गडाच्या प्रवेशव्दारापर्यंत वाहने पोहचावीत यासाठी पायथ्याशी रस्ता करण्यात आला. परिसर निसर्गरम्य वातावरणात असल्याने एकांतात फिरण्यासाठी याठिकाणी प्रेमुयुगुलांचा वावर असतो. त्याचरोबर मद्यपींचा वावर देखील वाढला आहे. गडपरिसरात किंवा तटबंदीनजीक लोक मद्यपान आणि धुम्रपान करतात. यापुर्वी अशा घटना अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काही संघटनांचे पदाधिकारी त्याठिकाणी लक्ष ठेवून असतात. 

काल सुट्टीच्या दिवसानिमित्त काही तरुण किल्ला परिसरात मद्य आणि धुम्रपान करताना एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे रंगेहात सापडलेल्यांची त्यांनी चांगलीच धुलाई केली. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून गड परिसराची स्वच्छता करुन घेतली. किल्याचे पावित्र राखले पाहिजे हे जरी खरे असले तरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे. असे प्रकार घडत असल्यास संबधीताना पोलिसांच्या ताब्यात देण्याची गरज आहे.

हेही वाचा - बेळगावात भाच्यावर मामाने गोळीबार करताच तो  झाला पशार अन्...

मात्र काही संघटनेचे पदाधिकारी थेट कायदाच हातात घेत आहेत. मुचंडी येथील तरुणाला टोळक्‍याने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असून आता या प्रकरणाला गंभीर स्वरुप प्राप्त झाले आहे. गडावर तरुणांच्या टोळक्‍याला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने सगळीकडे हा चर्चेचा विषय बनला आहे. 

"राजसहंसगडावर काल घडलेल्या प्रकाराबद्दल आपणाला अद्याप कोणतीही कल्पना नाही. तरुणांना मारहाण करण्यात आलेला व्हायरल झालेल्या व्हिडीओची पाहणी करुन चौकशी केली जाईल."

आनंद अडगुंद, पोलीस उपनिरीक्षक बेळगाव ग्रामीण ठाणे

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alcoholism youth assaulted from incumbent in belgaum