esakal | राज्यातील या परीक्षा रद्द : विद्यापीठ कोणती घेणार भूमिका, विद्यार्थ्यांना पडला प्रश्‍न.....
sakal

बोलून बातमी शोधा

All the exams in the state except the final year exams have been canceled.

राणी चन्नमा विद्यापीठाने यासंबंधी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे. 

राज्यातील या परीक्षा रद्द : विद्यापीठ कोणती घेणार भूमिका, विद्यार्थ्यांना पडला प्रश्‍न.....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव :  राज्यातील अंतीम वर्षाच्या परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, परीक्षा शुल्काच काय असा प्रश्‍न आता विद्यार्थ्यांना पडला आहे. यामुळे राणी चन्नमा विद्यापीठाने यासंबंधी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे. 

कोरोनामुळे 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे महाविद्यालये बंदच आहेत. जुलै महिना सुरु झाला तरी देखील महाविद्यालये सुरु होण्यासंबंधी कोणताच निश्‍चित असा  निर्णय झालेला नाही. परीक्षा होणार या दृष्टीकोणातून राणी चन्नमा विद्यापीठाने आपल्या अंतर्गत आलेल्या सर्व पदवी आणि पदव्यूत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरून घेतले होते. मात्र, परीक्षाच रद्द झाल्यामुळे परीक्षा फी संबंधी विद्यार्थ्यांतून चर्चा होत आहे. 

हेही वाचा- शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या हालचाली : 74 हजार शिक्षकांना मिळणार आता ऑनलाईन प्रशिक्षण -

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण यांनी शुक्रवारी  परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. कोरोनामुळे यंदा पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरची परीक्षा वगळता डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर व इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेबाबतचा विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. मात्र, परीक्षा फी मिळणार की नाही यासंबंधी संभ्रम कायम राहिला आहे. विद्यार्थ्यांना सरासरी गुण काढून उत्तीर्ण करीत त्यांना नवीन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

मात्र विद्यार्थी ज्या परीक्षेत नापास झाले आहेत, ते विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असला तरी परीक्षा काळात राज्यात कोरोनाची स्थिती कशी असेल, याचा विचार करुन परीक्षेचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत सुमारे 350 महाविद्यालये येतात. यातून सुमारे सव्वालाख विद्यार्थी पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेतात. सध्या फक्त अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. 

हेही वाचा- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना असा होईल फायदा.... -


सध्या फक्त अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पुन्हा मिळावे अशी मागणी होत आहे. यासंबंधी आम्ही उच्चशिक्षण खात्याला कळविले आहे. त्यांच्या सूचनेनंतर निर्णय घेण्यात येईल. 
-रामचंद्रगौडा, कुलगुरु, राणी चन्नमा विद्यापीठ 


संपादन - अर्चना बनगे

loading image