सांगलीत मिळून साऱ्याजणींचे फिटनेसबरोबरच पर्यटनही

अजित कुलकर्णी
Sunday, 24 January 2021

या 'मिळून साऱ्याजणीं'चे पर्यटन महिलांच्या विस्तारलेल्या कार्यकक्षांचे दर्शनच आहे. 

सांगली : कोण योग प्रशिक्षणाचे वर्ग घेते, कोण संगीताचे क्‍लासेस घेतेय तर कोण गृहिणी, समाजकार्य करतेय. पण सगळ्यांचा एकच कॉमन छंद...भटकंती. घरप्रपंच सांभाळत त्यांनी महिन्यातून एखादा छोटा ट्रेक करायचा. संधी मिळेल तेव्हा दूरची सहल करायची असे त्यांचे नियोजन असते. या 'मिळून साऱ्याजणीं'चे पर्यटन महिलांच्या विस्तारलेल्या कार्यकक्षांचे दर्शनच आहे. 

सांगलीसारख्या शहरात केवळ महिला पर्यटन, सहली करणारे डझनभर ग्रुप आहेत. फीटनेसबाबत दक्ष असणाऱ्या महिलांचा गोतावळा वाढत आहे. अर्चना कुलकर्णी या योग, प्राणायामचे क्‍लासेस विनामूल्य घेता-घेता महिलांना भटकंतीचा धडाही देताहेत. 'ऍबसोल्युट फीटनेस' नावाचा त्यांचा सुमारे 100 महिलांचा ग्रुप भटकंतीच्या छंदामुळे विस्तारत आहे. कुलू-मनाली, लेह-लडाख, राजस्थान राज्यात त्या गेल्या आहेत.

हेही वाचा - १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व मतदारांना ही सेवा उपलब्ध होणार आहे

सांगली-कोल्हापूर भागातील दुर्लक्षित डोंगर, कपाऱ्यात त्यांचा सतत संचार सुरू असतो. निमशिरगाव परिसरातील दुर्लक्षित पण ट्रेकिंगसाठी 'क्‍लास' असणारा तुकाई डोंगर, कोल्हापूर बायपासनजीकची बसवण खिंड, सादळे-मादळे डोंगर, मल्लिार्जुन डोंगर (गोटखिंडी) गिरीलिंग डोंगर, दंडोबा, रामलिंग ट्रेक अनेक वेळा केला आहे. दुर्गम वासोटा किल्ला महिलांना घेऊन चढाई केलीय. 

सुगम, शास्त्रीय व हार्मोनियमचे क्‍लास घेणाऱ्या अंजली तेलंग यांनी गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना पर्यटन घडवले आहे. त्यांनी कुलू मनाली, महाबळेश्‍वर, हंपी, व्हसपेठसह तिरुपती-बालाजी, गोवा, केरळ राज्यातही त्यांनी सैर केली आहे. वैशाली रामचंद्रे या पासष्टीतही फीट अँड फाईनचा मंत्र देत आहेत. तरुणाईच्या उत्साहाने त्यांची अखंड भटकंती सुरू आहे. बॅडमिंटन, सायकलिंग, धावणे हा नित्यक्रम आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य व्यायामप्रेमी असून त्यांच्या भटकंतीला प्रोत्साहन देतो. उत्तराखंडातील व्हॅली ऑफ फ्लॉवर व उटीनजीकचा निलगिरी पर्वत त्यांनी सहज सर केला आहे. 

हेही वाचा - हुबळी-धारवाड अपघाताची ‘सर्वोच्च’ न्यायालयात दखल

विशेष म्हणजे त्यांच्या भगिनीसोबत त्या भटकंती करतात. विशाळगड, पन्हाळा, पावनखिंड, राधानगरी, जोतिबा डोंगर, रामलिंग, बाहुबली तीर्थक्षेत्र त्या पायी जातात. आकार फौंडेशनच्या माध्यमातून कार्यरत उज्ज्वला परांजपे यांनीही भटकंतीसाठी महिलांचा ग्रुप स्थापन केला आहे. त्यांच्या ग्रुपने आतापर्यंत सुमारे 100 गड-किल्ले, पर्वत पायाखाली घातले आहेत. रांगणा, वासोटा, रायगड, पुरंदर, राजगड, वज्रगड, विसापूरगड, मधुमकरंदगड, सुंदरगड यासह दुर्गम कळसुबाई शिखर, रतनगड, हरिहरगड, ब्रह्मगिरी, दुर्गभांडार त्यांनी सर केले आहे. हिमालयातील काही सहलीही त्यांनी केल्या आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all ladies start a activity of tourism in sangli with fitness activity