चला, पृथ्वी जवळचा मित्र तारा पाहूया...!

Alpha Centauri (A) is the closest star to the earth
Alpha Centauri (A) is the closest star to the earth

कोल्हापूर - अनंत अवकाशाच्या गूढ अन्‌ गहण अशा पोकळीत जसा अनंत आकाशगंगा आहेत. तशा पद्धतीने अब्जावधी, खर्व म्हणता येईल, इतके तारेही आहेत. संध्याकाळी आकाशाच्या एका कोपऱ्यात सहज नजर टाकली की, काळ्याकुट्ट पोकळीत आपल्या आकाशगंगेचा पूर्व-पश्‍चिमेला दुधाळ पट्टा दिसतो. या आकाशगंगेत सूर्यमालेतील ग्रह, तारे, तारकासमूह अशा अनेकानेक गोष्टी दिसतात. तरीही आपण अनेकदा अवकाशाच्या कोपऱ्याकडे पाहत नाही. एक खरे की, अनंत अवकाशाच्या पटलावर एकदा तरी नजर टाकून पाहा. डोळे अक्षरश: दिपून जातील. दक्षिण आकाशात पृथ्वीचा अतिशय जवळचा मित्र तारा राहतो. तो म्हणजे, अल्फा सेंटारी (ए). आपल्या पृथ्वीचा मित्र म्हणून अल्फा सेंटारी (ए) प्रत्येकाने पाहायला हवा. हा मित्र तारा पाहायचा असेल तर रात्री चार वाजता बरोबर दक्षिणेला साधारण १२ अंशांवर आपणास अल्फा सेंटारी (ए) पाहायला मिळेल. पहाटे चार वाजता उठावे लागेल. प्रत्येकाने आपला मित्र तारा कसा दिसतो, हे जाणून घेतले पाहिजे. विशेषत: शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तरी. प्रत्येकाने आठवड्यातून एक-दोन वेळा अवकाशात पाहिले पाहिजे. हे विश्‍व कसे तयार झाले, याचा विचार केला पाहिजे, असे खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. 

 विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणाची पर्वणी  

नरतुरंग (सेंटॉरस) हा दक्षिण आकाशातील मोठा तारकासमूह. या तारकासमूहात अल्फा सेंटारी हा तारा पाहायला मिळतो. सूर्यापासून फक्त ४.३७ प्रकाश वर्ष दूर असणारा हा तारा सर्वात जवळचा तारा म्हणून ओळखला जातो. आकाशातल्या सर्वात तेजस्वी ताऱ्यांच्या यादीत हा तिसऱ्या स्थानी आहे. सायरस (व्याध), कॅनोपस, त्यानंतर अल्फा सेंटारी ताऱ्याचा नंबर लागतो. या ताऱ्याची दृश्‍यप्रत -०.२७ इतकी आहे. वस्तूत: हा एक तारा नसून तीन ताऱ्यांचा समूह आहे. मात्र, दिसताना तो एकच असल्यासारखा दिसतो. यातील अल्फा सेंटारी (ए) हा सूर्यापेक्षा १.१ पटीने अधिक वजनदार असून साधारण दीडपट अधिक तेजस्वी आहे. त्यापैकी अल्फा सेंटारी (बी) हा थोडा लहान असून सूर्यापेक्षा निम्मा तेजस्वी आहे. हे दोन द्वैती तारे असून एकमेकांभोवती फिरतात. 

दुर्बिणीन पहा राक्षसी तारा

तिसरा तारा म्हणजे, प्रॉक्‍झिमा सेंटारी हा आपल्या सर्वात जवळचा तारा. हा तारा फिकट असून उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागतो. याचा रंग लालसर असून हा एक राक्षसी तारा आहे. सूर्यापासून हा तारा ४.२४ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. म्हणजे, अल्फा सेंटारी (ए), (बी) पेक्षा तो थोडा जवळचा आहे. मग चला, पृथ्वीचा मित्र तारा पाहूया.

रात्री दक्षिण आकाशामध्ये जो प्रचंड आकाराचा तारकासमूह दिसतो, तो नरतुरंग नावाने ओळखला जातो. या तारकासमूहाचा आकार अर्धा मानव अन्‌ अर्धा घोडा अशी कल्पना केली जाते. या तारकासमुहात हे तारे आपण पाहू शकता. आपल्या पृथ्वीबद्दल, निसर्गाबद्दल, अवकाशाबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत. यातून ज्ञान मिळते. पृथ्वीकडे, अवकाशाकडे पाहण्याचा दृिष्टकोन विशाल होतो.
- डॉ. अविराज जत्राटकर, श्री यशवंतराव पाटील, विज्ञान महाविद्यालय, सोळांकूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com