मिरज हायस्कूल वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा टोकाचा संघर्ष 

प्रमोद जेरे 
Tuesday, 22 September 2020

मिरज हायस्कूलचे क्रीडांगण व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा डाव उधळून लावण्याचा निर्धार मिरज हायस्कूल बचाव समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

मिरज : मिरज हायस्कूलचे क्रीडांगण व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा डाव उधळून लावण्याचा निर्धार मिरज हायस्कूल बचाव समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. महासभेने नुकताच घाईघाईने मंजूर केलेला ठराव खंडित करण्यासाठी समितीचे शिष्टमंडळ उद्या (मंगळवारी) महापालिका आयुक्तांना भेटणार आहे. 

शिक्षणाची मोठी परंपरा आणि गरीब विद्यार्थ्यांचे हायस्कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महापालिकेच्या मिरज हायस्कूलचे क्रीडांगण व्यापाऱ्यांना विकण्याचा घाट महापालिकेतील कारभाऱ्यांनी घातला आहे. याविरोधात मिरज शहरातील सामाजिक संघटना तसेच मिरज हायस्कूल माजी विद्यार्थी एकत्रित आले आहेत. या सर्वांची आज (सोमवारी) मिरज हायस्कूलमध्येच बैठक झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी क्रिडांगणाचा बाजार करण्यास निघालेल्या महापालिकेतील कारभाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यांना कायमचा धडा शिकवण्याचे ठरले. यापूर्वी हेच क्रिडागंण विकण्याचा याच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न मिरजकर नागरिकांनी हाणून पाडला. 

तत्कालीन महापौर संगीता खोत यांनी याबाबतच्या कायदेशीर बाबी तपासूनच हा ठराव महासभेसमोर आणावा, असे आदेश देऊन हे क्रीडांगण विकण्याचा घाट घातलेल्या स्वकियांना धक्का दिला.

महापालिकेच्या या ठरावाविरोधात शहरातील ऍड. ए. ए. काझी, तानाजी रुईकर, डॉ. महेशकुमार कांबळे, जावेद पटेल, मुस्तफा बुजरुक, विवेक उर्फ बंडू शेटे, डॉ. प्रशांत लोखंडे, सुधीर गोखले, ओंकार शुक्‍ल, असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, बाळासाहेब पाटील, मनोहर कुरणे,जहीर मुजावर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते एकत्र आले असल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हे क्रीडांगण विकण्याची स्वप्ने पाहु नयेत, असेही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले. 

त्यासाठीच मिरज हायस्कूल बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून रस्त्यावरील तसेच कायदेशीर लढा देण्यासाठी समितीमधील अनेक सदस्य वकील मंडळीना सहकार्य करणार असल्याचीही ग्वाही यावेळी काही सदस्यांनी दिली. दरम्यान, महापालिका सर्वसाधारण सभेत घुसडण्यात आलेला ठराव खंडित करण्याच्या मागणीसाठी उद्या (मंगळवारी) समितीच्या वतीने आयुक्त नितीन कापडणीस यांना विनंती करण्याचे यावेळी ठरले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alumni struggle to save Miraj High School