esakal | मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवावर कोरोनाचे सावट 
sakal

बोलून बातमी शोधा

Ambabai Navratra Music Festival of Miraj in shadow of corona

संपूर्ण महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताच्या मेजवानीमुळे प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवावरही यावर्षी कोरोनाचे सावट आहे.

मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवावर कोरोनाचे सावट 

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली)  : संपूर्ण महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताच्या मेजवानीमुळे प्रसिद्ध असलेल्या येथील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवावरही यावर्षी कोरोनाचे सावट आहे. नवरात्रातील संगीत महोत्सवास प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. दूरवरच्या मान्यवर कलाकारही प्रवासाची सुविधा नसल्याने संगीत सेवेसाठी येण्यास तयार नाहीत. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या माध्यमातूनच ऑनलाइन पद्धतीने या संगीत उत्सवाचे आयोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. 

शास्त्रीय संगीताचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरात वर्षभरात किमान अकरा सार्वजनिक संगीत महोत्सवांचे होतात. याचा प्रारंभ 1938 मध्ये येथिल ख्वाजा मिरासाहेब दर्ग्यात झाली. किराना घराण्याचे अध्वर्यू संगीतरत्न मरहूम अब्दुल करीम खॉं यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर्ग्यामध्ये तीन दिवसीय संगीत सेवेचे आयोजन केले जाते.

यावेळी देश - विदेशातील अनेक दिग्गज कलाकार आपली संगीतसेवा दर्ग्यामध्ये रुजू करतात.दर्ग्यामधील संगीतसेवेच्या संयोजकांनी मिरजेची ग्रामदेवता अंबाबाईच्या नवरात्रानिमित्तही शास्त्रीय संगीत उत्सवाचे आयोजन करण्याचे ठरवले. यासाठी तत्कालीन जेष्ठ तबलावादक भानुदासबुवा गुरव, गणपतराव कवठेकर, डॉ रा. द. प्राणी आबासाहेब सतारमेकर, उमरसाहेब सतारमेकर यांनी पुढाकार घेतला. आणि 1954 मध्ये हा संगीत उत्सव सुरू झाला. मान्यवर कलाकारांच्या अदाकारीमुळे या उत्सवास रसिक मान्यताही मिळाली.

गेल्या काही वर्षापासून संयोजकांनी जेष्ठ सिने संगीतकार राम कदम तसेच विख्यात तबलावादक अबान मिस्त्री यांच्या स्मृतीनिमित्त विशेष संगीत पुरस्कारही देण्यास प्रारंभ केला. मात्र यावर्षी हे पुरस्कारही दिले जाणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले. महोत्सवाचे हे 66 वे वर्ष आहे.65 वर्षांच्या परंपरेत या वर्षी प्रथमच कोरोनामुळे संगीत महोत्सव बंद ठेवावा लागणार आहे. 

ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र सरकारने नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातल्याने हा शास्त्रीय संगीत उत्सव होऊ शकणार नाही.तरीही सांगली मिरज कोल्हापूर येथील कलाकारांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने या उत्सवाचे आयोजन करण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे.तथापी संयोजकांच्या या प्रयत्नास पोलीस प्रशासन परवानगी देते किंवा नाही यावरच या ऑनलाईन संगीत महोत्सवाचे भवितव्य अवलंबून आहे. 

संपादन : युवराज यादव