बाबासाहेबांना आवडायची शेवंताबाईच्या हातची बोंबलाची भाजी, थॉटस अॉफ पाकिस्तानही लिहिले नगरला

अमित आवारी
Tuesday, 14 April 2020

नगरमधील अशा वेळोवेळी झालेल्या भेटींदरम्यान डॉ. आंबेडकरांनी अनेक कार्यकर्ते जोडले. त्यात शिक्षक असलेले शंकर रानोजी साळवे यांचाही समावेश होता. शंकर साळवे यांचे कुटुंब नालेगावात राहत होते. डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीत सक्रिय होऊन साळवे गुरुजींनीही जिल्ह्यात सामाजिक कार्य केले.

नगर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नगरशी भावनिक नाते होते. सामाजिक कार्यक्रमानिमित्त डॉ. आंबेडकर नगरला अधूनमधून येत असत. तसेच दम्याच्या आजारावर उपचार घेण्यासाठीही ते नगरला अनेकदा आले होते. त्याच काळात नगरच्या मुक्कामात "थॉट्‌स ऑन पाकिस्तान' या महत्त्वपूर्ण ग्रंथाची काही पाने लिहिली गेल्याचे संदर्भ आहेत, असे महापालिकेचे यंत्र अभियंता परिमल निकम यांनी "सकाळ'ला सांगितले. 

इथे थांबले होते बाबासाहेब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दम्याचा आजार होता. नगर शहर शुद्ध हवेचे ठिकाण असल्याने स्वातंत्र्यसैनिक अच्युतराव पटवर्धन डॉ. आंबेडकरांना येथील आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन येत. त्या वेळी अच्युतरावांनी सध्याच्या बंधन लॉन परिसरातील जाधव मळ्याजवळ एका इमारतीत डॉ. आंबेडकर यांची राहण्याची सोय केली होती. त्या काळात बाबासाहेब "थॉट्‌स ऑन पाकिस्तान' या ग्रंथाचे लेखन करत होते. नगरच्या मुक्कामातही त्याचे काही लेखन बाबासाहेबांनी केल्याचे संदर्भ आहेत, असे निकम यांनी सांगितले. 

बोंबलाची भाजी आवडायची

नगरमधील अशा वेळोवेळी झालेल्या भेटींदरम्यान डॉ. आंबेडकरांनी अनेक कार्यकर्ते जोडले. त्यात शिक्षक असलेले शंकर रानोजी साळवे यांचाही समावेश होता. शंकर साळवे यांचे कुटुंब नालेगावात राहत होते. डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीत सक्रिय होऊन साळवे गुरुजींनीही जिल्ह्यात सामाजिक कार्य केले. शंकर साळवे यांच्या घरी डॉ. आंबेडकर किमान दोन ते तीन वेळा येऊन गेल्याचे निकम सांगतात. निकम हे शंकर साळवे यांचे नातू आहेत. शेवंताबाई शंकर साळवे यांच्या हातची बोंबलाची भाजी डॉ. आंबेडकरांना फार आवडायची, असे आजीने सांगितल्याची आठवणही निकम अभिमानाने उधृत करतात. 

डॉ. आंबेडकर जयंती घरीच करावी साजरी 
शंकर साळवे व शेवंताबाई साळवे यांना तीन मुलगे व पाच मुली. साळवे यांच्या पुढील पिढ्याही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जपत आहेत. डॉ. आंबेडकर जयंती, तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांना ही नवीन पिढी मदत करते. सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांनी घरीच थांबून आंबेडकरांची पुस्तके वाचून, त्यांना वैचारिक आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन साळवे दाम्पत्याचे असलेले परिमल निकम यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambedkar also wrote Thots of Pakistan to Ahmednagar